
DPDC Ambulance | प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी लवकरच 11 रुग्णवाहिका : पालकमंत्री पाटील
जळगाव : ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरीत रुग्णालयांपर्यंत नेण्यासाठी जिल्ह्यातील ११ रुग्णवाहिकांसाठी ‘डीपीडीसी’मधून (DPDC) २ कोटी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ११ रुग्णवाहिकांना प्रशासकीय मान्यता दिलेली असून, निविदा प्रक्रिया सुरु आहे.
त्यामुळे लवकरच ११ रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (11 ambulances for primary health centers soon by dpdc funding jalgaon news)
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येते. मात्र, काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या रुग्णवाहिका नादुरुस्त होत्या. त्यातच सध्या कोरोना सदृश्य विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयात ये- जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १०-१५ रुग्णवाहिका मिळाव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी २ कोटी निधीची डीपीडीसीमार्फत तरतूद केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
या ठिकाणी उपलब्ध होणार रुग्णवाहिका
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र (म्हसावद, ता. जळगाव), साळवा (ता. धरणगाव), शेंदुर्णी (ता. जामनेर), मारवड (ता. अमळनेर), किन्ही (ता. भुसावळ), ऐनगाव (ता. बोदवड), वाघळी (ता. चाळीसगाव), हातेड (ता. चोपडा), तळई (ता. एरंडोल), लोहारा (ता. रावेर), सावखेडा सिम (ता. यावल) या ठिकाणी प्रत्येकी १७ लाख रुपये निधीची आधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.