Unseasonal Rain: जळगाव जिल्ह्यात पुन्हा 1400 हेक्टरवर नुकसान; अवकाळी पावसाने शेतकरी बेजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unseasonal Rain

Unseasonal Rain: जळगाव जिल्ह्यात पुन्हा 1400 हेक्टरवर नुकसान; अवकाळी पावसाने शेतकरी बेजार

जळगाव : शहरासह जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १४०० हेक्टरवर रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. रात्री अचानक विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारांचाही पाऊस झाला.

अधिक नुकसान रावेर, चाळीसगाव, यावल तालुक्यात झाले आहे. अवकाळी पावसाने ६४ गावातील १९९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. होळी, धुळवडीला अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा गेल्या १५ मार्चपासून पुन्हा अवकाळी पाऊस जिल्ह्यात धुमाकूळ घालीत आहे. कधी हळूवार कधी जोरदार पावसाने खरीप पिकांसह केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कालच्या पावसाने गहू, केळी, मका, बाजारी, हरभरा, ज्वारी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात हरभरा १२९.७० हेक्टर, बाजरी ३५, गहू ३२७, मका ६८१, ज्वारी १८, भाजीपाला ११०, केळी ६.१० हेक्टरचे नुकसान झाले आहे.

मध्यरात्रीनंतरच्या पावसाने अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. तर शेतात चिखल झाला होता. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चिखलातून कसरत करीतच जावे लागले होते. आज दिवसभर कडक ऊन पडले होते. मात्र सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरासह ढगांच्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

तालुका निहाय नुकसान असे

यावल--५५.८२ हेक्टर

रावेर--८२९.२५

चाळीसगाव--४५९

पाचोरा--४.२०

टॅग्स :Jalgaonrain damage crops