Jalgaon Crime News : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत 2 बैल मृत्यूमुखी; कानळदा मार्गावर अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2 bullocks were killed in a bullock cart hit by speeding tractor jalgaon crime news

Jalgaon Crime News : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत 2 बैल मृत्यूमुखी; कानळदा मार्गावर अपघात

जळगाव : वाळू वाहतूक करण्यासाठी जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने (Tractor) बैलगाडीला दिलेल्या जोरदार धडकेत २ बैलांचा बळी गेला. शुक्रवारी (ता. ३) सकाळी दहाच्या सुमारास कानळदा मार्गावर ही घटना घडली. (2 bullocks were killed in a bullock cart hit by speeding tractor jalgaon crime news)

जळगाव-कानळदा रोडच्या बाजूला असलेल्या लक्ष्मी जीनिंगजवळ आव्हाने (ता. जळगाव) येथील शेतकरी दगडू राजाराम धनगर यांचे शेत आहे. शुक्रवारी दहाला दगडू धनगर मुलगा रावसाहेब यांच्यासोबत शेतातील पिकांना खत देण्यासाठी बैलगाडीने शेतात गेले. त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या रोडवर बैलगाडी उभी करून रासायनिक खते शेतात डोक्यावरून नेत होते.

रोडवर उभ्या बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीकडे जाणाऱ्या भरधाव वाळूच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही बैलांचा जागीच बळी गेला, तर बैलगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रॅक्टरही उलटून बाजूला पडले. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली व मदतकार्य सुरू केले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

सुदैवाने या ट्रॅक्टरजवळ शेतकरी दगडू धनगर व रावसाहेब धनगर नव्हते, नाहीतर त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला असता, असे बोलले जात आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघात घडल्यानंतर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, तर रस्त्यावर असलेल्या वाहतुकीचा बराच वेळ खोळंबा झाला होता.