Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार | 2 goats killed in leopard attack jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2 goats killed in leopard attack jalgaon news

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार

Jalgaon News : वरखेडे-दरेगाव (ता.चाळीसगाव) रस्त्यावरील शेतातील खळ्यातील जाळीत बंदिस्त शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. २३) रात्री घडली आहे.

त्यात दोन शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत तर दोन शेळ्या जखमी अवस्थेत आहेत. (2 goats killed in leopard attack jalgaon news)

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेले सात, आठ वर्षे या भागात बिबट्याची कायम दहशत राहिली आहे. दरम्यान, घटनेचा वन विभागाने पंचनामा केला आहे.

वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील सागर कच्छवा या शेतकऱ्याचे वरखेडे-दरेगाव रस्त्यालगत आडव्या नाल्याजवळच्या शेतातील खळ्यात आठ ते नऊ शेळ्या जाळी टाकून बांधलेल्या होत्या. शेतकरी सागर कच्छवा हे मंगळवारी (ता. २३) सायंकाळी घरी गेले.

बुधवारी (ता. २४) पहाटे पुन्हा शेतात गेले असता शेतातील जाळ्यातून दोन शेळ्यांचा फडशा पाडलेला दिसून आला. हा हल्ला बिबट्यानेच केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने दणकट जाळीवर झेप घेऊन दोन शेळ्यांचा फडशा पाडला तर दोन शेळ्यांचे नरडे फोडून जखमी करत बिबट्याने धूम ठोकली. आज पहाटे शेतकरी शेतात गेले असता हा प्रकार उघडकीस आली.

या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी श्रीराम राजपूत, वरखेडे पोलिस पाटील रोहिदास जगताप यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. श्रीराम राजपूत यांनी घटनेचा पंचनामा केला.

या भागात पुन्हा बिबट्याने पशुधनावर हल्ले सुरू केल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या सात, आठ वर्षांपासून या भागात बिबट्याचा उपद्रव सुरू आहे. सात वर्षांपूर्वी तर नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.