Jalgaon Crime News : चाळीसगावात 2 पोलिसांना मारहाण; भाजप पदाधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा | 2 policemen beaten up in Chalisgaon case filed against three including BJP office bearers Jalgaon Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police beating

Jalgaon Crime News : चाळीसगावात 2 पोलिसांना मारहाण; भाजप पदाधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा

Jalgaon Crime News : शहरातील भडगाव रस्त्यावरील लोखंडवाला कॉम्प्लेक्ससमोर हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला स्पीकर बंद करण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांना मारहाण करण्यात आली.

ही घटना मंगळवारी (ता. ९) रात्री घडली असून, यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह त्याच्या साथीदाराकडून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (2 policemen beaten up in Chalisgaon case filed against three including BJP office bearers Jalgaon Crime News)

चाळीसगाव पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी विजय अभिमन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मंगळवारी (ता.९) रात्री शासकीय वाहनातून पोलिस कर्मचारी नरेंद्र किशोर चौधरी यांच्यासह गस्त करीत होते.

त्यांना रात्री सव्वाबाराच्या सुमारास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी फोन करून भडगाव रोड, चाळीसगाव या परिसरात टेंपोवर मोठे स्पीकर लावून वाजवत असून, स्पीकर बंद करण्याबाबत आदेश दिले.

त्याप्रमाणे दोघे जण ताबडतोब भडगाव रोड येथे स्पीकर बंद करण्यासाठी शासकीय वाहनातून रवाना झालेत. या परिसरात लोखंडवाला कॉम्पलेक्ससमोर लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्या ठिकाणी टेम्पो वाहनावर (क्रमांक एमएच ०४, डीके ६६९७) स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणे लावून लोक नाचत होते.

त्यावेळी पोलिस कर्मचारी नरेंद्र चौधरी हे स्पीकर बंद करण्यासाठी गाडीतून उतरून पुढे निघाले, त्यावेळी पोलिस कर्मचारी विजय अभिमन महाजन मदतीसाठी त्यांच्यासोबत गेले व स्पीकर बंद करण्याची सूचना केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच यावेळी स्पीकर बंद केल्याच्या कारणावरून तेथे नाचणाऱ्या लोकांनी गर्दी करून गोंधळ घातला. त्यावेळी गर्दीमधील लोखंडवाला कॉम्पलेक्स परिसरात राहणाऱ्या भाजपचे पदाधिकारी श्‍याम नारायण गवळी ऊर्फ अण्णा गवळी याने स्पीकर बंद केल्याने पोलिस कर्मचारी विजय महाजन यांच्याशी हुज्जत घालून त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करून हाताने, चापटाने मारहाण केली.

पोलिसांनी त्यास प्रतिकार केला. तेव्हा त्याच्यासोबत असलेले अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. या झटापटीत विजय महाजन यांचा चष्मा खाली पडून तुटला. त्यावेळी पोलिस कर्मचारी नरेंद्र चौधरी मदतीला आले असता त्यांना देखील श्‍याम गवळी व त्याच्या दोन साथीदारांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.

पोलिसांनी त्या तिघांचा शोध घेतला असता ते गर्दीचा फायदा घेऊन तेथून पळून गेले होते. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी विजय महाजन यांच्या फिर्यादीवरून श्‍याम नारायण गवळी ऊर्फ अण्णा गवळी व

त्याच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून तसेच टेम्पोचालक (नाव पत्ता माहीत नाही) याने विनापरवाना वाहनावर मोठे स्पीकर लावून सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक शांतता भंग केल्याने टेंपोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करीत आहेत.