
Sakal Impact : वाहनांच्या लिलावातून 20 लाखांचा दंड वसूल
Jalgaon News : येथील तहसील कार्यालयाने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या २८ वाहनांचा लिलाव रविवारी (ता. २१) केला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अकरा वाहनांचा लिलाव झाला आहे. त्यातून २० लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
तहसील कार्यालयाने दोन ते तीन वर्षांत अनेक अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ठेवली होती.
त्याबाबत ‘सकाळ’ने गेल्या आठवड्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ‘जप्त वाहनांची भरली जत्रा’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. (20 lakh fine from vehicle auction Auction of 11 out of 28 vehicles transporting illegal minor minerals Jalgaon News )
त्याची दखल घेत तहसीलदार विशाल सोनवणे यांनी जप्त केलेल्या २८ वाहनांची लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. रविवारी तहसील कार्यालयात लिलाव प्रक्रिया झाली. त्यात अकरा वाहनांचे लिलाव झाले. अकरा वाहनांसाठी सर्वोच्च बोली लावणाऱ्या अकरा बोलीधारकांना लिलाव मंजूर करण्यात आला. त्यामुळे प्रलंबित असलेल्या दंडाचे २० लाख ७० हजार ५१० रुपये वसूल होणार आहेत.
तहसीलदार विशाल सोनवणे यांनी लिलाव प्रक्रिया राबविली. त्यांना महसूल सहाय्यक किशोर ठाकरे यांनी सहकार्य केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वाहनधारकांच्या मालमत्तांवर बोजे
इतर १७ वाहनांचा लिलाव झाला नाही. अशा वाहनधारकांचा शोध घेऊन त्यांच्या मालमत्तांवर बोजे बसविणार आहेत.
यात बँकेचे खाते सील करणे, मालमत्तांवर बोजे बसविण्यात येतील. जेणेकरून ते मालमत्तांची विक्री करू शकणार नाहीत, अशी माहिती तहसीलदार सोनवणे यांनी दिली. लवकरच इतर जप्त वाहनांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.