
Jalgaon News : क्रूर नियतीने गर्भातील त्या बाळाचा बाप हिरावला! हृदयदिनी युवकाची चटका लावणारी ‘एक्सिट’
Jalgaon News : कशी काळाची चाहूल आली...बाग सुखाची करपून गेली...कसं विपरीत झालं सारं..होता सोन्याचा संसार... राजा राणीचा दरबार...‘या गीताशी साधर्म्य असणारी दुर्दवी घटना कोळपिंप्री (ता.पारोळा) येथे घडली. कुटुंबाचा आधारवड असलेला चौतीस वर्षीय युवक रामकृष्ण गोकुळ काटे- पाटील याची जागतिक हृदयदिनीच तीव्र हृदयविकाराने निधन झाले, अन् होत्याचे नव्हते झाले.
त्याची अकाली झालेली ‘एक्सिट’ अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. एकीकडे क्रूर नियतीने नऊ महिन्याची गरोदर असलेल्या पत्नीचे कुंकू पुसले तर दुसरीकडे याच क्रूर नियतीने जन्म होण्यापूर्वीच गर्भातील त्या बाळाचा बाप ही आपल्यातून हिरावून नेला.
हा प्रसंग पाहून अनेकांची मने हेलावल्याने डोळ्यातून अश्रू धाराही वाहत होत्या. (34 year old youth Ramakrishna Gokul Kate Patil died of acute heart attack jalgaon news )
कोळपिंप्री (ता पारोळा) येथील गोकुळ नवल काटे व कल्पना गोकुळ काटे हे दांपत्य किराणा दुकान, गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह भागवत होते. त्यांचा मोठा चिरंजीव रामकृष्ण काटे हा बीएससीचे शिक्षण घेऊन भोईसर येथे खासगी कंपनीत नोकरीला होता, तर लहान मुलगा ज्ञानेश्वर काटे हा पण बीएससीचे शिक्षण पूर्ण करून अंकलेश्वर येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यातच दोन्ही मुलांना पहिल्या मुली होत्या आणि आता दोन्ही सुना गरोदर होत्या.
कुटुंबात तिसरी पिढीतील सदस्यांचे आगमन होणार असल्याने त्या सर्वांचा आनंद गगनात मावेनसा झाला होता. तीन पिढीचे एकत्रित ‘काटे कुटुंब’ सर्वांना हेवा वाटावा असे होते. मात्र या सुखी कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली.
दरम्यान रामकृष्णची पत्नी मनीषा काटे ही गर्भवती राहिल्याने हर्ष व सुखाची किनार कुटुंबाला मिळाली होती. आपल्या घरी चार, पाच दिवसांत नवीन पाहुणा येईल म्हणून सर्वच जण आनंदीत होते. उद्याची भावी स्वप्ने पाहत असतानाच क्रूर नियतीने आपला फास टाकत रामकृष्ण काटे (वय-३४) यांना आपल्या जाळ्यात अडकविले.
हृदयविकाराचा झटका अन्...
एकीकडे जागतिक हृदयविकार दिन साजरा होत असताना दुसरीकडे त्याच दिवशी शुक्रवारी (ता. २९) हृदयविकाराच्या झटक्याने त्या युवकाचे निधन झाले. अन् अखेर ‘होत्याचे नव्हते’ झाले. जन्म होण्यापूर्वीच त्या गर्भातील बाळाचा बाप या क्रूर काळाने आपल्यातून हिरावून नेला. रामकृष्ण काटे हा अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा होता, त्याच्या वक्तृत्वाने तो अनेकांना आपलेसे करायचा.
त्याचा मित्रांचा गोतावळा ही मोठा होता. त्याच्या पश्चात वडील गोकुळ काटे, आई कल्पना काटे, पत्नी मनीषा, चार वर्षीय मुलगी रुही, लहान भाऊ ज्ञानेश्वर, भावजाई असा परिवार आहे. तो मनोहर काटे याचा पुतण्या होत. काल रात्री साडेबाराच्या सुमारास कोळपिंप्री येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.