
Jalgaon Crime News : साळिंदरची हत्या करुन मांस शिजवणारे चौघे ताब्यात
कुऱ्हा काकोडा (जि. जळगाव) : रंगपंचमीच्या दिवशी वढोदा (ता. मुक्ताईनगर) जवळील चिंचखेडा खुर्द शेती शिवारात सायाळ (साळिंदर) या वन्यप्राण्याची शिकार (hunting) करून त्याच्यावर ताव मारण्याच्या तयारीत असताना वढोदा वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांच्यासह वन पथकाने धडक देत, चौघा संशयितांना ताब्यात घेतले. (4 arrested for killing Salinder and cooked meat jalgaon crime news)
बुधवारी (ता. ८) या चौघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ७) सर्वत्र धुलिवंदनाचा जल्लोष सुरु असताना दुपारच्या सुमारास वढोदा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांना माहिती मिळाली, की काही जण जंगलात सायाळ या वन्यप्राण्याची शिकार करुन त्याचे मांस शिजवून खात आहेत.
त्यानुसार, त्यांनी वढोद्याजवळील चिंचखेडा खुर्द शेती शिवारात वनपाल बी. आर. मराठे, वनरक्षक ज्ञानोबा धुडगंडे, राम असुरे, बी. बी. थोरात, गोकूळ गोसावी, वनमजुर अशोक तायडे, अशोक पाटील आदींनी धडक दिली असता, चिंचखेडा खुर्द शिवारातील सुपडा मेनकार यांचे शेतात जमिनीवर रक्त पडलेले होते. शिवाय रक्ताने माखलेली काठी, साळिंदरचे चार पंजे आणि अर्धवट जळालेले काटे तेथे मिळून आले.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
पथकाने सुपडा मेनकार याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, चिंचखेडा येथील ऋषिकेश अहिरकर याच्या शेतातील शेडमध्ये साळिंदरचे मास शिजवत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ जाऊन पाहणी केली असता, साळिंदर प्राण्याचे कच्चे मांस शिजवताना निवृत्ती उर्फ बाबूराव रामचंद्र मेनकार, ऋषिकेश सुरेश अहिरकर, सुपडा रामचंद्र मेनकार (तिघे रा. चिंचखेडा खुर्द, ता. मुक्ताईनगर) व शंकर साहेबराव सपकाळ (रा. बुलढाणा) असे चौघे मिळून आले.
या चौघांना वन विभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार, गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे करीत आहेत. दरम्यान, जंगलातील वन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ जंगलाशेजारील गावांमधील ग्रामस्थांनी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वन क्षेत्रपाल सचिन ठाकरे यांनी केले आहे.