Jalgaon News: संप मिटताच 63 टक्के वसुली; महसूल विभागाच्या वसुलीत 20 टक्क्यांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

property tax

Jalgaon News: संप मिटताच 63 टक्के वसुली; महसूल विभागाच्या वसुलीत 20 टक्क्यांनी वाढ

जळगाव : जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावी, या मागणीसाठी गेल्या १४ मार्चपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. तो गेल्या सोमवारी (ता. २०) मागे घेण्यात आला.

संप मिटताच तीन दिवसांत वार्षिक वसुली वेगाने सुरू झाली आहे. संपाअगोदर असलेली ३८.६९ टक्के वसुली ६३ टक्के झाली आहे. अजून सहा दिवस शिल्लक असल्याने शंभर टक्के वसुलीचा प्रयत्न असल्याचे महसूल विभागातर्फे सांगण्यात आले.

शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात महसूल विभागाचे अकराशेवर कर्मचारी सहभागी झाले होते. मार्च महिना वर्षभरातील महसूल वसुलीचा असतो. १ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन महसूल वसुली पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पंतप्रधान ग्रामीण योजनेची प्रलंबित प्रकरणे त्वरित पूर्ण करा, गौणखजिन व जमीन महसूलबाबत दिलेले लक्षांक अधिकाऱ्यांना वेळेत पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, १४ पासून कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. यामुळे महसूली वसुली ३९ टक्क्यांवर बंद झाली होती.

संप काळात अधिकारी केवळ कार्यालयात होते. कर्मचारी संपावर होते. मार्चअखेरची कामे कशी पूर्ण करावीत, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला होता. कोशागार विभागात तीनशेंवर विविध बिलांच्या फाईल प्रलंबित होत्या.

संपामुळे मार्चअखेर खर्च करावयाचा निधीही परत जाणार होता. मात्र, संप सातव्या दिवशी मिटल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

संप मिटल्यानंतर सर्वच महसूल विभागाचे कर्मचारी महसूल वसुलीला लागल्याने ३९ टक्क्यांवर असलेली वसुली ६३ टक्क्यांवर गेली आहे.

महसूल वसुली अशी

तालुका--वसुली--टक्केवारी

*बोदवड--१ कोटी ४० लाख--४०.०९ टक्के

*जळगाव--९ कोटी ९४ लाख--३५.९७

*भडगाव--२ कोटी ७० लाख--५१.५६

*चोपडा--३ कोटी ८४ लाख--५१.२६

*अमळनेर--५ कोटी १३ लाख--५५.४६

*पारोळा--२ कोटी ५५ लाख--५६.८४

*धरणगाव--५ कोटी ६४ लाख--६६.३९

*चाळीसगाव--१० कोटी ४१ लाख--६५.११

*पाचोरा--६ कोटी ६९ लाख--६९.९६

*मुक्ताईनगर--४ कोटी १४ लाख--७४.०१

*यावल--५ कोटी ८२ लाख--७७.६८

*भुसावळ--९ कोटी ३० लाख--७५.९८

*रावेर--६ कोटी ३६ लाख--८७.७५

*जामनेर--८ कोटी ७२ लाख--१०३.१६

*एरंडोल--७ कोटी ७५ लाख--८८.५८

*एकूण--८१ कोटी ६५ लाख-- ६३.२३ टक्के