Jalgaon News: चोपड्यात बनावट बियाण्याची 95 पाकिटे जप्त; जळगाव कृषी विभागाची कारवाई | 95 packets of fake seeds seized in Chopda jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 seeds

Jalgaon News: चोपड्यात बनावट बियाण्याची 95 पाकिटे जप्त; जळगाव कृषी विभागाची कारवाई

Jalgaon News : जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहराबाहेरील अग्रवाल पेट्रोलपंपाच्या बाजूला हॉटेल ‘न्यू सुनीता’मध्ये तपासणी केली असता रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप आधार पाटील (रा. वर्डी, ता. चोपडा) यांनी ठेवलेले बनावट अंकुर सीड्स कंपनीची स्वदेशी ५ संकर देशी कापूस बियाणे असलेले ९९ हजार ७५० रुपये किमतीची ९५ सीलबंद पाकिटे आढळून आली आहेत. (95 packets of fake seeds seized in Chopda jalgaon news)

ही कारवाई मंगळवारी (ता.२३) मध्यरात्री करण्यात आली. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत संदीप पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना शहराबाहेर चोपडा-धरणगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेल न्यू सुनीतामध्ये बनावट बियाणे असल्याची माहिती मिळाली.

त्यावरून शहर पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली असता वर्डी येथील संदीप आधार पाटील यांनी गाडी खराब झाली म्हणून दोन प्लास्टिकच्या पिशव्या ठेऊन गेल्याची माहिती हॉटेलचे व्यवस्थापक अमोल राजपूत यांनी सांगितले.

त्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यात बनावट अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी- ५ संकर देशी कापूस बियाणे असलेली ९९ हजार ७५० रुपये किमतीची ९५ सीलबंद पाकिटे आढळून आली. त्यावरून अरुण तायडे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसांत शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांच्याविरोधात शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी परवानाधारक बियाणे विक्री केंद्रातूनच पक्क्या बिलासह परवानाधारक उत्पादक कंपनीचे बियाणे खरेदी करावे, असे आवाहन नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी नाशिक विभागातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.

संशयित संदीप आधार पाटील यांना चोपडा शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी संतोष चव्हाण यांनी ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते.

दरम्यान, संदीप पाटील यांना गुरुवारी (ता. २५) न्यायालयात हजर केले जाणार असून, अजूनही बोगस बियाण्याच्या रॅकेटमध्ये कोण कोण आरोपी आहेत, त्यांचा शोध घेण्यात येईल, असे तपास अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonFarmerseed