PWD Tree Plantation : चोपडा-हिंगोणा रस्त्यावरील 48 झाडे जाळली; अधिकारी अनभिज्ञ | About 48 trees planted by pwd were burnt by farmers jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burnt tree on Hingona road and previous state of trees

PWD Tree Plantation : चोपडा-हिंगोणा रस्त्यावरील 48 झाडे जाळली; अधिकारी अनभिज्ञ

Jalgaon News : सार्वजनिक बांधकाम विभागाने चोपडा- मजरे- हिंगोणा रस्त्याच्या कडेला लावलेली दहा ते बारा फूट उंचीची जवळपास ४८ झाडे एका शेतकऱ्याने जाळून त्या झाडांची राखरांगोळी केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे.

या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (About 48 trees planted by pwd were burnt by farmers jalgaon news)

सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी रस्त्याच्या कडेस झाडे लावतात. ही झाडे लावण्यासाठी शासनाचा पैसाही खर्ची होतो. मात्र याकडे लक्ष देणे आवश्यक असताना पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही. शेतकरी मॉन्सूनपूर्व मशागत करताना आग लागण्याचे असे प्रकार घडत असतात.

चोपडा मजरे हिंगोणा रस्त्यावर अकुलखेडा गावापासून मजरे हिंगोणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरील योगीजी महाराज कुटिया परिसरातील शेताच्या बांधास आणि रस्त्याच्या कडेस असलेली जवळपास ४८ मोठी झाडे शेतकऱ्याने हेतुपुरस्सर जाळून टाकली आहेत.

ही सर्व झाडे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लावण्यात आलेली होती. मात्र या घटनेला चार दिवस लोटल्यावरही सार्वजनिक बांधकाम विभागाला याचा थांगपत्ता नसल्याने हिंगोणा येथील पदाधिकारी आणि ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हिंगोणा येथील उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सांगोरे यांनी माहिती दिली, की योगीजी महाराज यांच्या कुटियाशेजारी असलेल्या शेताच्या मालकाने दोन, तीन दिवसांपूर्वी आठ ते दहा फुटाचे ४८ झाडांच्या बुंध्याला शेतातील काडीकचऱ्यासह काही भाग पेटवत असताना त्या आगीमध्ये सर्व झाडे जळून खाक झाली आहेत. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागास माहिती देऊनही झाडे पेटवून तीन, चार दिवस कोणताही शाखा अभियंता किंवा अधिकारी फिरकायला तयार नाही, असेही नंदकिशोर सांगोरे यांनी कळविले.

सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी व्ही. बी. राजपूत यांना याबाबतीत विचारणा केली असता झाडे कुठे पेटवली, असा प्रश्न त्यांनी सर्वप्रथम केला. त्यामुळे सार्वजनिक बांधकामचे अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.

प्रमुख अधिकारी व कनिष्ठ अधिकारी हे कार्यालयात बसत नसल्याने यासारख्या इतरत्र रस्त्याच्या कडेला वृक्षतोडीच्या अनेक घटना घडत असताना त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. उपविभागीय अधिकारी व्ही. बी. राजपूत यांच्याकडे चोपडा येथील प्रभार असल्याने ते आठवड्यातून केवळ दोन दिवस येतात. मुख्य अधिकारीच नसल्याने एकही कनिष्ठ अभियंता कार्यालयात बसत नाही, हे वास्तव आहे.

"संबंधित प्रकाराबद्दल शाखा अभियंत्यांना सांगितले असून, या ठिकाणी जाऊन पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना वृक्षतोडीबाबत वृक्षांची जाळपोळ केल्याबाबत पत्र देण्याचे सांगितले आहे. वन विभाग, पोलिस ठाण्यात पत्र देणार आहोत." - व्ही. बी. राजपूत, उपविभागीय अभियंता, सा. बां. विभाग, चोपडा

"मोठी वृक्ष जाळल्याचा निंदनीय प्रकार केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लावलेल्या वृक्षांना एका क्षणात जाळून नष्ट केल्यामुळे हिंगोणा ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झालेला आहे." - नंदकिशोर सांगोरे, उपसरपंच, हिंगोणा तथा संचालक चोपडा बाजार समिती