
Local Crime Branch : लाचप्रकरणी पोलिसासह मदतनीस एसीबीच्या जाळ्यात
बोदवड (जि. जळगाव) : खंडणीच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्यासाठी २० हजारांची लाच (Bribe) मागून तडजोडीअंती १६ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यासह एकास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ( ACB arrest police and helper in bribery case jalgaon news)
ही कारवाई शनिवारी (ता. २५) सकाळी साडेअकराच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचून करण्यात आली. बोदवड ठाण्याचा पोलिस कर्मचारी वसंत नामदेव निकम व खासगी पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर अशी अटकेतील संशयिताची नावे आहेत.
शहरातील तक्रारदारासह त्याच्या तीन मित्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असून, हा गुन्हा एलसीबीऐवजी स्थानिक स्थरावर करण्यासाठी तपासाधिकारी असलेल्या हवालदार वसंत निकम याने प्रत्येकी ५ हजाराप्रमाणे २० हजारांची लाच मागितली होती.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
मात्र चार हजार प्रत्येकी देण्याचे ठरल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार शनिवारी (ता. २५) सकाळी साडेअकराला तहसील कार्यालयाच्या आवारात निकम यांनी पंटर एकनाथ बाविस्कर याच्याकडे लाच रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पंटरने लाच स्वीकारताच पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव व सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला.