Jalgaon News : पुतणीचा बस्त्यासाठी गेलेल्या काकांचा अपघाती मृत्यू | Accidental death of uncle who went for nephews wedding shopping Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Jalgaon News : पुतणीचा बस्त्यासाठी गेलेल्या काकांचा अपघाती मृत्यू

Jalgaon News : पुतणीचे लग्न ठरल्याने लग्नाचा बस्ता फाडायला गेलेल्या काकावर काळाने झडप घातल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (ता. ७) दुपारी दोनच्या सुमारास घडली. पहूर- शेंदुर्णी मार्गावरील ऋषीबाबा मंदिरानजीक झालेल्या अपघातात काकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (Accidental death of uncle who went for nephews wedding shopping Jalgaon News)

फर्दापूर तांडा (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील ईश्वर ज्योथमल चव्हाण (वय ३२) यांच्या पुतणीचे लग्न ठरले आहे. तिच्या लग्नासाठीचा बस्ता करण्यासाठी ते शेंदुर्णी येथे आले होते. बस्ता करुन झाल्यानंतर ईश्वर चव्हाण आपल्या पल्सर मोटारसायकलने (क्रमांक- एम. एच. २८ एएच ६८०) चिंचोली येथे कामानिमित्त जाण्यासाठी निघाले.

गोंदेगावजवळील ऋषी बाबा मंदिरासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ईश्वर चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली.

ईश्‍वर चव्हाण यांच्या जवळ मिळून आलेल्या मोबाईलवरून या अपघाताची माहिती नातेवाईकांना कळविण्यात आली. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली असून सोमवारी (ता. ८) सकाळी शवविच्छेदन केले जाणार असल्याचे डॉ. अमोल पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

याबाबत ज्ञानेश्वर श्रावण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत पाटील करीत आहेत.

दरम्यान, मयत ईश्वर चव्हाण हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरीतार्थ चालवित होते. ज्या पुतणीच्या बस्त्यासाठी ते शेंदुर्णीत आले होते, तिला त्यांनी मुलीप्रमाणे जीव लावला होता. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

एकूलत्या एक मुलाचा मृतदेह पाहून वृद्ध वडिलांना शोक अनावार झाला होता. या घटनेबद्दल फर्दापूर तांडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.