Jalgaon Crime News: MVP छापेमारी प्रकरणात ॲड. चव्हाण अटकेत; BHRमध्ये अटकपूर्वने वाचले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

While arresting Adv. Praveen Chavan and bringing him to the police station.

Jalgaon Crime News: MVP छापेमारी प्रकरणात ॲड. चव्हाण अटकेत; BHRमध्ये अटकपूर्वने वाचले

जळगाव : मराठा विद्याप्रसारक संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांच्या घरावर पुणे पोलिसांनी टाकलेल्या छापा प्रकरणात दाखल गुन्ह्यात ॲड. प्रवीण चव्हाण यांना आज पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह पथकाने अटक केली. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

दरम्यान, ॲड. चव्हाण यांना बीएचआर खंडणी प्रकरणात जिल्‍हा न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. आज मविप्रच्या गुन्ह्यात त्यांना अटक झाली. (Adv chavan arrested in MVP raid case Jalgaon Crime News)

मविप्र संस्थेतील वादाच्या प्रकरणात अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांच्या ताब्यातून संस्था मिळविण्यासाठी त्यांना पुण्यात बोलावून नंतर अपहरण करून त्यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हा कोथरूड (पुणे) पोलिसांत वर्ग करण्यात आला होता.

पुणे पोलिसांच्या पथकाने नीलेश भोईटे यांच्या घरावर (९ जानेवारी २०२२) भोईटेनगरात छापा टाकला होता. त्या वेळी तिथे विजय भास्कर पाटील व किरण साळुंखे असे दोघेही कारने (एमएच २० बीएन ०९०) साथीदारांसह पोचले.

त्यांनी बेकायदेशीररीत्या भोईटे यांच्या घरात प्रवेश केला. सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या कापडी पिशवीत काही फाइल्स व रक्ताने माखलेला चाकू घरात प्लाँट केला, यातून गंभीर गुन्ह्यात अडकविण्याचा कट केला असून, या सर्व घटनक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. ते नीलेश भोईटेंनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांना सुपूर्द केले.

संशयितांनी भोईटे यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत ज्या पद्धतीने रक्ताने माखलेला सुरा प्लाँट केला त्याच प्रकारे भोईटे यांच्या घरातील प्रोसिडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड असे महत्त्वाचे दस्तावेज संशयितांनी बनावटीकरण करण्यासाठी घेऊन गेल्याप्रकरणी शहर पोलिसांत नीलेश भोईटे यांच्या तक्रारीवरून (७ ऑक्टोबर २०२२) गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पुरवणी जबाबात संशयित वाढले

शहर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे अ‍ॅड. विजय भास्कर पाटील व किरण साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास करताना तक्रारदार भोईटेंचा पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासाअंती तत्कालीन विशेष सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनील दत्तात्रय माळी अशा सहा संशयितांची नावे वाढविण्यात आली होती.

खंडणीत दिलासा, मविप्रत फटका

बीएचआर अपहार प्रकरणात सुनील झंवर यांच्या जामिनाला मदत करण्यासाठी त्यांचा मुलगा सूरज याच्याकडून एक कोटी २२ लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी ॲड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर आणि उदय पवार यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात जिल्‍हा न्यायालयाने तिघांना अटकपूर्व जामीन नुकताच मंजूर केला आहे. मविप्र प्रकरणात मात्र चव्हाणांना जेलवारी झाली.

टॅग्स :Jalgaoncrime