Jalgaon News : पुतण्याच्या मृत्यूनंतर काकूनेही सोडले प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Jalgaon News : पुतण्याच्या मृत्यूनंतर काकूनेही सोडले प्राण

पाचोरा : येथील हनुमाननगरात २७ वर्षीय पुतण्याच्या निधनाची वार्ता ऐकून ४० वर्षीय काकूने देखील प्राण सोडले. एकाच ट्रॅक्टरवरून पुतण्या व काकूची एकत्रित अंत्ययात्रा काढण्यात आल्याने हनुमाननगरसह शहरवासीय हळहळले.

हनुमाननगरात दादाभाऊ मोरे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. दोघा भावांचे एकत्र कुटुंब असून, मोलमजुरी व मिळेल ते काम करून हे कुटुंब आपला चरितार्थ चालवत होते. (After death of nephew to aunt also passed away Jalgaon News)

हेही वाचा: Nashik Accident News : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस व ट्रक ची धडक झाल्याने भिषण अपघात

बुधवारी (ता. ११) मोरे कुटुंबीय वरखेडी (ता. पाचोरा) येथील काकांचे गंधमुक्त कार्य आटोपून सायंकाळी उशिरा पाचोरा येथे आल्यावर त्यांचा लहान मुलगा किरण मोरे (वय २७) हा याच संदर्भात निरोप देण्यासाठी रात्री आठच्या सुमारास हनुमाननगराजवळील रेल्वेरूळ ओलांडून शहराच्या दुसऱ्या भागाकडे जात होता.

याच वेळी मुंबईकडून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव रेल्वेचा धक्का लागून किरण फेकला गेला. गाळण शिवारातील रेल्वे खांब क्रमांक ३६९ - १८ ते २० च्या दरम्यान भरधाव रेल्वेचा त्याला फटका बसल्याने तो जागीच मरण पावला.

लोको पायलट जे. एच. देवरे यांनी आपल्या वॉकीटाकीवरून स्टेशन अधीक्षकांना या संदर्भात माहिती दिली. त्यांनी ती पाचोरा पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे अमोल पाटील यांच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला, मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिस नाईक सचिन निकम तपास करीत आहेत. किरणच्या अपघाताची वार्ता मोरे कुटुंबीयांना कळाल्यानंतर मोरे कुटुंबीय कमालीचे खचले.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Breaking News : सिन्नर शिर्डी महामार्गावर भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू

साऱ्यांनीच मन हेलावणारा आक्रोश केला. दोन्ही भावांचे एकत्रित कुटुंब असल्याने आईसमान असलेली मयत किरणची काकू उषा सोनार यांना पुतण्याच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसला. त्या अत्यवस्थ झाल्या. त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. परंतु जळगाव पोचण्याआधीच त्यांनी प्राण सोडला. किरण मोरे व उषा सोनार या दोन्ही पुतण्या व काकूचे मृतदेह एकाच वेळी घरी आणण्यात आले. त्यावेळी मोरे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश साऱ्यांच्याच पापण्या ओलावणारा ठरला.

मृत किरण मोरे याच परिसरात चहा, नाश्त्याचे दुकान चालवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होते. गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी व्यवसायासाठी रिक्षाही विकत घेतली होती. घरातला कर्ता म्हणून किरण कुटुंबात महत्त्वाचे होते. त्यांच्या काकू उषा यादेखील शहरातील दवाखान्यात काम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. त्यांच्या पतीची ही अवघड शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वी झाल्याने हे कुटुंब कमालीचे आर्थिक विवंचनेत होते.

हेही वाचा: Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!

अशा परिस्थितीत संक्रांतीसारख्या गोड सणाच्या पूर्वसंध्येला कुटुंबातील दोन्ही कमावत्यांचा अवघ्या काही तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने मोरे कुटुंबा पुढील दाही दिशा अंधारल्या आहेत. मृत किरण मोरे यांच्या पश्चात आजी, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार असून, मृत उषा सोनार यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी (ता. १२) सकाळी एकाच ट्रॅक्टरवर दोघांचे मृतदेह ठेवून एकत्रित अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी हनुमाननगरातील रहिवाशांसह शहरवासीय कमालीचे हळहळले.

हेही वाचा: Rajasthan Crime News: संतापजनक! 4 काकांनी मिळून 15 वर्षीय भाचीवर केला सामूहिक बलात्कार; तोंडात कोंबला कापूस अन्..

टॅग्स :Jalgaondeath