
Jalgaon News : डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बालकाचा गँगरीनने दुर्दैवी मृत्यू! तीन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : पाथरी (ता. जळगाव) येथील ११ वर्षीय बालकाचा गँगरीनने मृत्यू झाल्याची घटना ऑक्टोबर २०२१ मध्ये घडली होती. (After year and half long struggle case was registered against 3 doctors of Pathari against child death case jalgaon news)
दुर्वेश नाना पाथरवट असे मृत बालकाचे नाव असून, सलग चारदिवस गावातील वेगवेगळ्या तीन डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनच्या जखमांमध्ये दुर्वेशच्या कंबरेवर सेप्टिक होऊन कंबरेपासून माडीपर्यंत गँगरीन झाले. तज्ज्ञ डॉक्टरांकडे शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
वैद्यकशास्त्राची परवानगी नसतानाही कथित डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्याने, तसेच अहवालात डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे बालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणी दीड वर्षांनी बालकाच्या आईच्या फिर्यादीवरून पाथरी गावातीलच तिन्ही डॉक्टरांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. युवराज पाटील व डॉ. सुभाष जाधव यांचा समावेश आहे.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
इंजेक्शनचा दुर्वेश ठरला बळी
नेमका मृत्यू कसा झाला, याचे कारण शोधण्यासाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीला पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी अभिप्राय दिला.
या अभिप्रायात दुर्वेश यास इंजेक्शन देणारे पाथरी गावातील डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. युवराज पाटील व डॉ. सुभाष जाधव यांना इंजेक्शन टोचण्याबाबत न्याय वैद्यकशास्त्राची कुठलीच परवानगी नसतानाही त्यांनी बालकास कमरेवरती इंजेक्शन दिले आणि या इंजेक्शनमुळे दुर्वेश यास गँगरीन होऊन त्याचा मृत्यू झाला, असे नमूद होते.
त्यानुसार गुरुवार (ता.२३) दुर्वेश याची आई प्रतिभा नाना पाथरवट यांच्या फिर्यादीनुसार डॉ. स्वप्नील पाटील, युवराज पाटील आणि डॉ. सुभाष जाधव यांच्याविरोधात निष्काळजीमुळे मुलाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे पुढील तपास करीत आहेत.