
Amrut Yojana 2.0 : ‘अमृत’चा आराखडा करण्यास मुंबईच्या एजन्सीचा नकार
Jalgaon News : पाणीपुरवठा मंजूर अमृत २.० योजनेच्या विकास आराखडा करण्यास नियुक्त केलेल्या मुंबई येथील एजन्सीने नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेला नवीन मक्तेदार नियुक्त करावा लागणार आहे. त्याबाबत महापौर व आयुक्तांनी बैठकीत चर्चा केली. (agency in Mumbai has refused to develop development plan of Amrut 2.0 scheme jalgaon news)
मागील महासभेत मुंबई येथील एजन्सी नियुक्तीचा ठराव केला होता. मात्र, मंजूर झालेला ठराव तीन महिने रद्द करता येत नसल्यामुळे ३० मेस होणाऱ्या महासभेत एजन्सी नियुक्तीचा विषय घेता येणार नसल्याची समस्या निर्माण झाली आहे.
महापालिकेत मंगळवारी होणाऱ्या महासभेबाबत आढावा बैठक महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात झाली. उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनवणे व विभागप्रमुख उपस्थित होते. महासभेच्या विषयांबद्दल आयुक्त व विभागप्रमुखांची चर्चा झाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अमृत सल्लागार एजन्सी नियुक्ती
अमृत २.० योजनेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी मागील महासभेत सर्वांत कमी दर असलेल्या मुंबई येथील एजन्सीला काम देण्याचा ठराव करण्यात आला. आता त्या एजन्सीने कामाचा व्यापामुळे हे काम करता येत नसल्याचे मनपाला कळविले आहे. त्यामुळे पुन्हा एजन्सी नियुक्त करावी लागणार आहे.
ठराव झाल्यानंतर तीन महिने ठराव रद्द करता येत नसल्यामुळे येणाऱ्या महासभेत हा ठराव घेता येणार नाही. मात्र, कार्यवृत्त तपासून दोन नंबरच्या कमी दराच्या आलेल्या एजन्सीचा प्रस्ताव मंजूर करून त्यांना नियुक्त करता येते का याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली, तसेच इतर विषयांवरही चर्चा झाली.