Jalgaon News : वर्षभरापासून प्रवासी सेवा बंद; जळगावातून विमान सेवा प्राधिकरण गाशा गुंडाळणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon airport authority

Jalgaon News : वर्षभरापासून प्रवासी सेवा बंद; जळगावातून विमान सेवा प्राधिकरण गाशा गुंडाळणार?

जळगाव : विकास, योजनांच्या प्रत्येक बाबतीत दुर्दैवी ठरलेल्या जळगावच्या नशिबी आणखी एक दुर्दैव येऊन ठेपलंय.. वर्षभरापासून विमानसेवा (Airlines) ठप्प आहे. (Airline Services Authority will wrap passenger services which has been closed for year jalgaon news)

ती सुरु होण्याच्या शक्यताच आता धूसर झाल्याने विमानतळ प्राधिकरण जळगावातून गाशा गुंडाळण्याच्या स्थितीत असल्याचे वृत्त आहे. प्राधिकरणाला जळगाव विमानतळाचा पांढरा हत्ती पोसणे आता डोईजड झाले आहे.

केंद्र सरकारच्या ‘उडान योजनेंतर्गत २६ डिसेंबर २०१७ ला जळगाव -मुंबई विमान सेवेला सुरवात झाली. तीन महिन्यात आठवड्यातून तीन वेळा विमान फेऱ्यांची सुविधा देण्यात आली होती. तीन महिने उलटत नाही, तोवर या विमानसेवेला खोडा बसला. तांत्रिक कारण सांगत काही दिवस सेवा बंद राहिली.

मग नंतर परवडत नसल्याचे कारण पुढे करत सेवा देण्यास आलेल्या कंपन्या एकामागून एक पळ काढू लागल्या. एअर डेक्कन आली- गेली, ट्रु-जेटने काही काळ प्रयत्न केला. नंतर ती सेवाही ठप्प झाली. त्यानंतर प्रवासी विमानसेवेचा बंद- चालूचा खेळ सुरुच राहिला. वर्षभरापासून तोदेखील बंद पडून सेवा पूर्णपणे ठप्प झाली.

सेवा सुरूच्या केवळ बातम्याच!

जळगाव शहरातून आता अखंडित विमान सेवा सुरु होणार, मुंबई-अहमदाबाद सेवा, ट्रू- जेटने घेतली जबाबदारी, केंद्रीय उड्डयन मंत्र्यांचा हिरवा कंदील अशा आशयाच्या केवळ बातम्या येत राहिल्या. प्रत्यक्षात विमानसेवा बंदच राहिली. आता जळगाव विमानतळ केवळ व्हीआयपी वापरासाठी आणि प्रशिक्षण केंद्रासाठीच शिल्लक राहिले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

इतर विमानतळे सुरू

‘उडान’ योजनेअंतर्गत वर्ष-२०१७ मध्ये नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग-चिपळूण (चिपी) यांसह जळगाव अशा चार विमानतळांचा समावेश करण्यात आला होता. जळगाव वगळता तिन्ही विमानतळ अविरतपणे सुरु असून नाशिक येथून आठवड्याच्या सातही दिवस उड्डाण सुरु आहे.

जळगाव येथूनही जळगाव -पुणे, जळगाव -मुंबई, जळगाव -इंदूर यासाठी प्रवाशांची रीघ असून आजमितीस किमान वीस प्रवासी विमानतळावर भेट देत विमानसेवा सुरू आहे काय, म्हणून चौकशी करत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीवरून समोर आले.

विस्तारीकरण लटकले

जळगाव विमानतळावर सद्य:स्थितीत एक हजार ७०० मिटर लांबीची धावपट्टी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेल्या ‘उडान’ योजनेचा प्रचंड गाजावाजा करत विमानतळ विस्तारासाठी तब्बल ७५० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले.

नशिराबाद ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या इच्छा नसताना त्यांना जमिनी देण्यास भाग पाडण्यात आले. त्यातून ३ हजार मीटर लांबीची विस्तारीत धावपट्टी तयार होणार हेाती.याचा मास्टर प्लॅनही तयार आहे. मात्र, त्याला मुर्तरुप मिळणे आता अशक्य वाटू लागले आहे.

अधिकारी बोलावले परत..

विमानतळ प्राधिकरणाचे २३ अधिकारी- कर्मचारी जळगाव विमानतळावर कार्यरत होते. त्यापैकी नुकतेच तीन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या दिल्लीस्थित मुख्यालयाने जळगाव विमानतळाबाबत अधिकृत माहिती मागितल्याचे वृत्त असून वर्षभरापासून खाली हात बसलेल्या अधिकाऱ्यांना केव्हा बिढ्यार गुंडाळून जावे लागेल, हे सांगता येत नाही.

म्हणून अधिकारी वर्ग बदलीच्या तयारीला लागला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या माहिती बाबत स्थानिक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

वर्षाला साडेसहा कोटींचा तोटा

जळगाव विमानतळ पोसणाऱ्या विमानतळ प्राधिकरणाला वर्षाला साडेसहा कोटीचा तोटा येत असून तीन लाख रुपये नुसते वीजबिल भरावे लागत आहे. विमानतळ प्राधिकरणाचे २०+१ अधिकारी, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएडीसी)ची २४ तास ४७+१ अशी सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली असून हा सर्व खर्च कोणी पेलायचा यावरून ई-मेल सुरु झाल्याचे सांगण्यात आले.

विमानतळ असे..

- जमीन : ७५० एकरात विस्तार

- १७०० मीटर धावपट्टी

- डीव्हीआर : रडार यंत्रणा

- नाईट लॅण्डींगची सुविधा

असा आहे प्रवास

वर्ष-१९७१ : भूमिपूजन (मधुकरराव चौधरी)

वर्ष-१९७३ : विमानतळाचे उद्‌घाटन (मुख्यमंत्री वसंतराव नाईक)

वर्ष-२००७ : विमानतळाचे हस्तांतरण (मनपाकडून एमएडीसीकडे)

वर्ष-२०१० : विमानतळाचे पुन्हा एकदा भूमिपूजन(१३ जून)

वर्ष-२०१२ : तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पण(२३ मार्च)

वर्ष-२०१६ : ‘उडान’ योजनेत समाविष्ट

वर्ष-२०१७ : उड्डाणास विमानतळ तयार

वर्ष-२०२१-२२ : प्रवासी विमानसेवा बंद

टॅग्स :JalgaonAeroplane