Jalgaon Crime News : आईनेच केली मुलाची हत्या; संबंध लपविण्यासाठी मामी-भाच्याचे कृत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court Order

Jalgaon Crime News : आईनेच केली मुलाची हत्या; संबंध लपविण्यासाठी मामी-भाच्याचे कृत्य

अमळनेर (जि. जळगाव) : भाच्याशी असलेले संबंध लपविण्यासाठी स्वतःच्या मुलाचे (Son) तुकडे करून त्याचा निर्घृण खून करणाऱ्या चहार्डी येथील आईला (Mother) व तिच्या भाच्याला अमळनेर सत्र व जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Amalner Court give life imprisonment to mother who brutally murdered her son to hide relationship with her niece jalgaon crime news)

चहार्डी (ता. चोपडा जि. जळगाव) येथे २ फेब्रुवारी २०१९ ला घडलेल्या या खळबळजनक घटनेची हकिगत अशी, आरोपी महिला व समाधान विलास पाटील (वय २५, रा. चहार्डी, ता. चोपडा, जि. जळगाव) हे मामी व भाचा दोघांमध्ये संबंध होते.

महिला आरोपीचा मुलगा मंगेश (वय १२) याने आई व समाधान यांना पाहिले. मंगेशने ही बाब मी वडिलांना सांगेल, असे सांगितले. त्याचक्षणी महिलेने बाजूला पडलेल्या काठीने स्वतःच्या मुलाच्या डोक्यास मागील बाजूस तीन-चार वेळा मारले. त्यात त्याचे डोके फुटून तो बेशुद्ध झाला. त्याचवेळेस समाधानने मंगेशच्या तोंडात कापडी बोळा कोंबल्याने त्याचा मृत्यू झाला.

समाधानच्या घरात मृत मंगेशचा मृतदेह लपविण्यात आला. रात्री बारानंतर मामी आणि भाचा यांनी मिळून मृत मंगेशच्या मृतदेहाचे तुकडे केले. तसेच काही तुकडे जाळण्याचा प्रयत्न करून मृत मंगेश यास कुणीतरी अज्ञाताने अपहरण करून नरबळी दिल्याचा बनाव केला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

मृताचे वडील दगडू लोटन पाटील यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३०२, २०१ व ३४ प्रमाणे फिर्याद दाखल केली. या प्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक मनोज पवार व पोलिस निरीक्षक योगेश तांदळे यांनी प्राथमिक तपास केला.

त्यांनतर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पुढील तपास केला. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्या न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील किशोर बागूल (मंगरूळकर) यांनी १५ साक्षीदार तपासले.

त्यात न्यायालयाने डीएनए अहवाल, डॉ. स्वप्नील कळसकर, डॉ. नीलेश देवराज पाटील, प्रदीप कुलदीप पाटील, तपासाधिकारी योगेश तांदळे, श्वानपथकाचे विनोद चव्हाण यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी महिला व समाधान याना कलम ३०२ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

असे कलम..अशी शिक्षा

न्यायालयाने दोघी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व ३०० रुपये दंड तसेच भादंवि कलम २०१ प्रमाणे दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दोन्ही आरोपी अटकेपासून कारागृहात होते.

या कामी पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार उदयसिंग साळुंखे, पोलिस कर्मचारी हिरालाल पाटील तसेच चोपडा शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी नितीन कापडणे व हरीश तेली यांनी काम पाहिले. दोघी आरोपी कारागृहात असल्याने तसेच वकील लावण्याची परिस्थिती नसल्याने त्यांना शासनाकडून वकील नेमण्यात आले.