
Jalgaon News : ...अन् अडकला बिबट्या!
मेहुणबारे (जि. जळगाव) : गिरणा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पशुसंहार करणारा व वन विभागाला चकवा देणारा नर जातीचा बिबट्याला (Leopard) आज (ता. १०) सकाळी बहाळ (ता.चाळीसगाव) येथील प्रभाकर शेवरे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे.
गावात माहिती मिळताच बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.(Animal killer leopard finally nailed by Forest Department jalgaon news)
बहाळ (ता. चाळीसगाव) या भागात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचे हल्ले सुरूच होते. बिबट्याने गिरणा परिसरात धुमाकूळ घातला होता. येथील भागात आदल्या दिवशी गोऱ्हा ठार केला होता. वन विभागाने ज्या शेतात दोन पिंजरे ठेवले होते, त्या पिंजऱ्यात दररोज अदलून बदलून खाद्य ठेवले जात होते. ट्रॅप कॅमेऱ्यात देखील बिबट्या हा कैद झाला होता.
...अन् अडकला बिबट्या
वन परिक्षेत्रातील बहाळ येथे मागील महिनाभरपासून धुमाकूळ घालणारा बिबट प्राणी अखेर जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले आहे. महिन्यात बिबट्याने १५ जनावरे फस्त केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या बिबट्यास जेरबंद करण्याची ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती.
वन विभागाने या ठिकाणी दोन पिंजरे बसवले होते, तसेच या बिबट प्राण्याच्या हालचाली ओळखण्यासाठी पाच ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या ठिकाणी पिंजऱ्यात ठेवलेले भक्ष खाण्यासाठी बिबट्या पुन्हा रात्री तेथे आला व पिंजऱ्यात असलेल्या खाद्य खाण्यासाठी गेला अन् पिंजऱ्यात अडकला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
वन विभागाची कामगिरी
गेल्या काही दिवसांपासून हा बिबट या भागातून सोडून जावा, यासाठी जागोजागी फटाके फोडण्यात आले होते. श्री. शेवरे यांच्या शेतात ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले. या बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी संदीप भट यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनसंरक्षक धुळे दि. वा. पगार, उपवनसंरक्षक (जळगाव) विवेक होशिंग, सहाय्यक वनसंरक्षक (जळगाव) सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, विवेक देसाई, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे वनपाल आर. व्ही. चौरे,
वनरक्षक जी. एस. पिंजारी, चंद्रशेखर पाटील, अश्विनी ठाकरे, राहुल पाटील, काळू पवार, महेंद्र शिंदे, रवी पवार, संजय चव्हाण, दिनेश कुलकर्णी, राहुल मांडोळे, ज्ञानेश्वर पाटील, जुगराज गढरी, अशोक पाटील, सिद्धार्थ वाघ यांनी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मदत केली. या ठिकाणी राकेश चौधरी यांची देखील मदत झाली.
बिबट्याला सोडले नैसर्गिक अधिवासात
गिरणा परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, एक गेला की दुसरा लगेचच येतो. त्यामुळे आता पुन्हा नवीन बिबट्या सक्रिय होतो की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याच्या सुरक्षेसंदर्भात वरिष्ठांच्या आदेशानुसारच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी दिली.