
Jalgaon Crime News : उन्हाळी सुटीत दुबईला जाणे महागात; घरफोडीत 9 लाख लंपास
Jalgaon Crime News : उन्हाळी सुटीनिमित्त कुटुंबासह दुबईला गेलेल्या पत्रकार तथा मुस्लिम धर्मगुरुच्या मेहरुणमधील अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलूप, दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाखांची रोकड व सोने- चांदीचे दागिने असा सुमारे ९ लाखांचा ऐवज चोरुन नेला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (apartment in Mehrun 9 lakh stolen in burglary jalgaon crime news)
एका वृत्तपत्राचे संपादक व धर्मगुरु मोहम्मद हारुण अब्दुल कादीर खाटीक (वय ४५) हे पत्नी तरन्नुमबी व मुलगी फातेमा यांच्यासह मेहरुणमधील युनूस राणानी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त खाटीक कुटुंबीय २३ ते ३१ मे या कालावधीत दुबई येथे फिरायला गेले होते.
३१ मेस दुपारी १२ वाजता परत आल्यानंतर खाटीक यांना त्यांच्या घराचा लाकडी दरवाजा खुला दिसला. त्यांच्या दरवाजास आतील बाजूने डोअरलॉक असून ते तुटलेले व बाहेरुन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.
आत जाऊन पाहिले असता लोखंडी कपाट उघड होते, त्यातील सामान अस्ताव्यस्त पडला होता. तसेच बेडरुममधील कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील संपूर्ण रोकड व सोन्या-चांदीचे दागिने सर्व साहित्य लंपास झाल्याचे आढळून आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
घरातील लाकडी कपाटात पत्नी व मुलीने रमजानच्या महिन्यात जमा केलेली अनामत रक्कम १ लाख रुपयेही गायब होते. असे एकूण साडेआठ ते ९ लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला, अशी फिर्याद खाटीक यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यावरुन गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर जगदाळे करत आहेत.
असा गेला ऐवज
रोकड : १ लाख (५०० रुपयांच्या २०० नोटा)
५ तोळे वजनाच्या २ लाख रुपयांच्या सोन्याच्या मंगलपोतसह, अडीच तोळ्यांची सोन्याची पोत, १ तोळा सोन्याची पोत, ५ ग्रॅम सोन्याची पोत, १ तोळे वजनाचा सोन्याचा हार, १.५ तोळे वजनाची सोन्याची अंगठी, १ तोळे वजनाची सोन्याची चेन, ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,
१ तोळे वजनाचे सोन्याचे कानातले, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाची कानातील रिंग, ५ ग्रॅम वजनाचे कानातले सोन्याचे वेल, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३० भार वजनाच्या ५ जोड चांदीच्या साखळ्या असा मोठा ऐवज लंपास झाला.