BJP Vs Shivsena : दिल्ली दूर...! बाजार समितीच्या गल्लीतच ‘युती’ला फुटीचे फटाके... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bjp and shivsena

BJP Vs Shivsena : दिल्ली दूर...! बाजार समितीच्या गल्लीतच ‘युती’ला फुटीचे फटाके...

"भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्ता हवी होती. त्यांनी शिववेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना फोडून सत्ता स्थापन केली. आता तर शिंदे यांना शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हही मिळाले आहे.

त्यामुळे आमची त्यांच्याशी युती आहे, त्याच बळावर आम्ही ‘दिल्ली’तील सत्ता कायम ठेवणार आहोत, असा दावाही केला जात आहे. परंतु दुसरीकडे वास्तव मात्र वेगळेच दिसत आहे. दिल्लीच्या निवडणूका तर दूरच; परंतु बाजार समितीच्या निवडणूकीतच भाजपला शिंदे गटाचे ‘ओझे’ वाटू लागल्याचे दिसत आहे.

त्यातून, भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आता युतीबाबतचा निर्णय जिल्हास्तरीय नेत्यांवर सोपविला आहे. त्यांच्या बैठकीत काय निर्णय होईल, याकडे लक्ष आहे. मात्र, आता स्थानिक स्तरावर भाजप व शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde) गटात फुटीचे फटाके वाजू लागल्याचे चित्र मात्र दिसत आहे." -कैलास शिंदे (article about market committee election bjp vs shiv sena Alliance jalgaon politics news)

जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समित्त्यांच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील सत्ता संघर्षानंतर ग्रामीण स्तरावर ही निवडणूक होत आहे. या निवडणूकीनंतर राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका आणि त्यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राज्यात सत्ताधारी भाजप व शिंदे गट युतीचे की महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे, याबाबत चित्र काहीअंशी स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील निवडणूकीची दिशाही ठरणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षानी कंबर कसली आहे.

बाजार समिती निवडणूक ही ग्रामीण भागात पक्षाचा पाया भक्कम करण्याची निवडणूक आहे. त्या ठिकाणी एकी असल्यास आपला विजयाचा मार्ग सुकर असेल, तसेच या एकीतून आपल्याला भविष्याच्या निवडणूकीतही यश मिळेल हे विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीने ओळखले.

त्यामुळे बाजार समिती निवडणूकीत ‘महाविकास’ आघाडी म्हणून समोरे जाण्याबाबत त्यांनी निर्णय घेतल्याचे दिसत आहे. जळगाव बाजार समितीबाबत महाविकास आघाडीची पहिली बैठक माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली जळगावात झाली. आता पारोळा येथे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची बैठक होत आहे. विरोधी पक्षांनी आपली एकत्रित मोर्चेबांधनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

विरोधी महाविकास आघाडी जय्यत तयारी करीत असतानाच राज्यातील सत्ताधारी भाजप व शिंदे गट मात्र स्थानिक स्तरावर युतीसाठी चाचपडताना दिसत आहे. बाजार समितीसाठी शिदे गटातर्फे बैठक घेण्यात आली. त्यात युतीबाबत ठोस असा निर्णय झाला नाही. तर भाजपने घेतलेल्या बैठकीत थेट पक्षातर्फे ‘स्व-बळाचा’नारा देण्यात आला.

या बैठकीत तर जिल्ह्याचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याविरूद्ध तक्रारीचा ‘पाढा’च कार्यकर्त्यांनी वाचल्याचे दिसत आहे. तशी ही कारणे नवीन नाहीत. ज्यावेळी शिवसेना व भाजप युती होती, त्यावेळी जी कारणे होती तीच आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. त्यावरूनच ‘बाजार समिती’निवडणूक ‘युती’तर्फे नव्हे, तर ‘स्व-बळावर’ लढवावी असा सूर भाजप कार्यकर्त्यांनी लावला आहे.

राज्यात सत्तेत असलेला भाजप व शिवसेना (शिंदे गट) आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका युतीच्या माध्यमातून निवडणूका लढवून यश मिळविण्याचा दावा करीत आहेत. परंतु, जिल्हास्तरावर भाजपला आता शिंदे गटाचा सत्तेतील वाटा नकोय. तसेच निवडणूकीत त्यांचे ओझे नकोसे वाटू लागल्याचे दिसत आहे.

कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या निवडणूकीत आपल्या ‘स्वबळाच्या’ भावना बोलून दाखविल्या. तर ‘युती’बाबतचा निर्णय दोन्ही पक्षाच्या जिल्ह्यातील वरीष्ठ नेत्यांकडे सोपविला आहे. परंतु कार्यकर्त्याची मनेच जर ‘युती’करण्याबात दुभंगले असतील, तर नेत्यांनी युती घोषित करून त्याला किती प्रतिसाद मिळेल हा प्रश्‍नच आहे.

जिल्ह्यातील नेते गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे व चिमणराव पाटील हे बाजार समिती निवडणूकीत ‘युती’बाबत ठाम राहणार, कि आगामी निवडणूका लक्षात घेवून आपली ‘जागा’ सुरक्षित करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मागे जाणार, याकडेच लक्ष असणार आहे. परंतु राज्यात भाजप व शिंदे गट पक्क्या युतीचा दावा करीत असले, तरी जिल्हा स्तरावर फुटीचे फटाके पुटू लागले आहेत. आता खरी परीक्षा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आहे, एवढे मात्र निश्‍चित.