Ashadhi Wari 2023 : मुक्ताईच्या जयघोषात पालखी निघाली पंढरीला; आषाढी वारीसाठी प्रस्थान! | Ashadhi Wari 2023 Sant Muktabai palkhi headed for Pandharpur jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Muktai palkhi headed for Pandharpur for Ashadhi Wari.

Ashadhi Wari 2023 : मुक्ताईच्या जयघोषात पालखी निघाली पंढरीला; आषाढी वारीसाठी प्रस्थान!

Ashadhi Wari 2023 : तालुक्यातील श्री संत मुक्ताई संस्थान कोथळी समाधीस्थळ येथून आषाढी वारीसाठी हजारो वारकऱ्यांच्या मेळ्यासह मुक्ताई पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता. २) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. (Ashadhi Wari 2023 Sant Muktabai palkhi headed for Pandharpur jalgaon news)

जुन्या कोथळी मंदिराच्या सभामंडपातील छोटेखानी कार्यक्रमात आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून महाआरती करून पालखी खांद्यावर घेत मुक्ताई चरणी सेवा दिली.

तत्पूर्वी खासदार रक्षा खडसे, बऱ्हाणपूरचे आमदार शेरा भय्या, माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी भेट देऊन मुक्ताईचे दर्शन घेतले.

मुलींचे बालसंस्कार शिबिर आणि पालखी सोहळा प्रस्थाननिमित्त संत सखाराम महाराजांचे वंशज रामेश्वर महाराज तिजारे यांचे काल्याचे कीर्तन झाले.

या वेळी संस्थानचे ॲड. रवींद्र पाटील, पालखी सोहळा नियोजनासाठी आलेले पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे मेघराज महाराज वळखे, निवृत्ती पाटील, विलास धायडे, रवींद्र दांडगे, विशाल महाराज खोले, नितीन महाराज अहीर, विजय महाराज खवले,

श्रीसंत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे, संदीप भय्या पाटील, यू. डी. पाटील, कल्पना हरणे, गीता जुनारे, दुर्गा मराठे महाराज, कृष्णा महाराज, भावराव महाराज, अंबादास महाराज यांच्यासह असंख्य कीर्तनकार, टाळकरी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तत्पूर्वी जुन्या मंदिरावर सकाळच्या महाप्रसादाची व्यवस्था पांडुरंग पवार (चापोरा) व नवीन मंदिरावर दुपारचा महाप्रसाद महाजन परिवाराकडून देण्यात आला. तसेच प्रकाश पाटील (नाचनखेडा) यांचे पालखी रथाचे मानाचे बैल विधिवत पूजन करून मिरवणुकीने गुरुवारीच पोहोचले होते.

आज पहाटे मंगल काकडारतीने आई मुक्ताईस महापूजा पुंडलिक पवार (चापोरकर) यांच्या हस्ते करण्यात आली, तसेच संस्थानचे मानकरी व अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांचे हस्ते पुजारी विनायक व्यवहारे यांनी पादुकांना पंचामृत अभिषेकाने सुरवात करताच वारकरी दिंडीनी प्रस्थान भजन सुरू केले.

वारकरी, भाविक ‘मुक्ताई -मुक्ताई’ जयघोषात देहभान हरपत तल्लीन झाले होते. दुपारी रणरणत्या उन्हात दुपारी तीनला आमदार चंद्रकांत पाटील व संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते पादुका पालखीत स्थानापन्न करीत पालखीचे प्रस्थान झाले.

नवीन मंदिरात विसावा

‘मुक्ताई’ चा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात पालखी मंदिर परिक्रमा पूर्ण करत रथात ठेवून प्रस्थान पार पडले. गावोगावीच्या दिंड्या हजारो वारकरी रणरणत्या उन्हातही मुक्ताबाई भजनात तल्लीन झाले होते. जुन्या मंदिरातून भुसावळमार्गे प्रवर्तन चौकातून येताना ठिकठिकाणी स्वागत करीत नवीन मुक्ताबाई मंदिरात विसावा घेतला.