Latest Marathi News | रस्त्याची दुरवस्था; वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A truck lying on the side of the road due to pits on Dhule highway

Jalgaon News : रस्त्याची दुरवस्था; वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

मेहुणबारे (जि.जळगाव) : चाळीसगाव-धुळे रस्ता म्हटला की, 'काय तो रस्ता, काय ते खड्डे' हे वाक्य वाहनचालकांमध्ये रूढ होऊ लागले आहे. कारण, तरवाडे बारी ते चाळीसगाव बायपासपर्यंत रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाल्यामुळे दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू ट्रक यांना मोठी कसरत करावी लागते आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे वाहन नादुरुस्त होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. आता लोकप्रतिनिधींनीच या खडतर खड्ड्यांच्या मार्गातून वाहनचालकांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.(bad condition of roads on chalisgaon Dhule highway drivers life in danger jalgaon latest marathi news)

चाळीसगाव-धुळे महामार्ग हा जणूकाही मृत्यूचा सापळा झाला आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविताना कुठून चालवावे, असा प्रश्न चालकांना पडलेला असतो. या रस्त्यावरील अपघात नित्याचाच झाला आहे. वाहनधारकांना अक्षरशः कसरत करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, सोमवारी खड्ड्यांमुळे कंटेनर नादुरुस्त झाल्याने या महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती.

काही दिवसांपूर्वी हे खड्डे माती टाकून बुजविण्यात आले. मात्र दोन, चार दिवसांतच या खड्ड्यांमधील माती निघून पुन्हा ‘जैसे थे’ खड्डे तयार झाले. हे खड्डे डांबर टाकूनच बुजवावेत तरच अपघाताची मालिका थांबेल.

खड्ड्यांच्या दुर्देशेबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन मूग गिळून बसले आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. अत्यंत वर्दळीचा असलेला हा महामार्ग संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे मरणाच्या खाईत ढकलला गेला आहे. सद्यःस्थितीत किमान खड्डे तरी बुजवावेत, अशी आर्त मागणी नागरिकांमधून होत आहे.

धुळ्याचे लोकप्रतिनिधी ठरले सरस

चाळीसगाव - धुळे महामार्गावर जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांची वाहने नादुरुस्त होणे, खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याच्या खाली वाहन जाणे, अपघात होणे असे प्रकार जणू नित्याचे झाले आहेत. तरीही सुस्त यंत्रणेला जाग येत नाही.

मात्र तरवाडे बारी सोडल्यावर धुळे जिल्हा सुरू होतो. तरवाडे गावापासून ते धुळ्यापर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले आहेत. मात्र आपल्या तालुक्याला धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सरस ठरले असल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा: नाशिकमधील कावळा व्यसनांचा ठरणार बळी!; जाणुन घ्या कारण

"मागे दोन वर्षांपूर्वी हा रस्ता नव्याने तयार करण्यात आला होता. आता त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. पडलेले खड्डे बुजविण्याची साधी तसदी कोणी घेत नाही. खड्ड्यांमुळे अनेकदा वाहनांचे नुकसान होते. ज्यामुळे आम्हाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो."

- सतीश पाटील ,भऊर, ता.चाळीसगाव

"रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना पाठ, मान व कमरेचे विकार जडत आहेत. खड्ड्यांमुळे अपघातही वाढले आहेत. संबंधित विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त कधी सापडणार? "

- सुनील बारवकर ,मेहुणबारे, ता. चाळीसगाव

"वाहन चालविताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालवावे लागते. दुचाकी चालविताना खड्ड्यांमुळे ती घसरेल की काय अशी भीती असते. त्यामुळे तातडीने खड्डे तरी बुजले पाहिजे."

- भाऊसाहेब पाटील ,खडकीसिम, ता.चाळीसगाव

हेही वाचा: Nashik : वाट चुकलेल्या महिलेची पोलिसांकडून मूळ गावी रवानगी

Web Title: Bad Condition Of Roads On Chalisgaon Dhule Highway Drivers Life In Danger Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..