Jalgaon News : दुर्गंधीयुक्त पाण्याची विक्री; रेल निर प्रवाशांसाठी डोकेदुखी! | Bad smelling water is found in Rail Neer water bottles at stalls of railway station jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

(Bad smelling water is found in Rail Neer water bottles at stalls of railway station jalgaon news

Jalgaon News : दुर्गंधीयुक्त पाण्याची विक्री; रेल निर प्रवाशांसाठी डोकेदुखी!

Jalgaon News : येथील रेल्वे स्थानकावरील स्टॉल्सवर ‘रेल नीर’ या पाण्याच्या बाटल्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी आढळून येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे विक्रेते व प्रवाशांमध्ये वाद होत आहेत. (Bad smelling water is found in Rail Neer water bottles at stalls of railway station jalgaon news)

‘सील’ केलेल्या या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा स्टॉलधारकांना वरुनच झालेला असल्याचे स्टॉलधारकांचे म्हणणे आहे. या पाण्याला काहीशी दुर्गंधी देखील येत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार तातडीने थांबवून बाटल्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

येथील रेल्वे स्थानकावर २५ ते ३० स्टॉल्स आहेत. प्रत्येकी स्टॉलवरुन दररोज सुमारे २५ ते ३० बॉक्स ‘रेल नीर’ पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी मागवल्या जातात. भुसावळ ते नाशिकपर्यंत सर्व स्टॉलधारकांना तसेच साईड पेंट्रीकार तसेच रेल्वेच्या बोगींमध्ये ‘रेल नीर’ हेच पाणी विक्री करणे रेल्वे प्रशासनाने अनिवार्य केले आहे.

संबंधित कंपनीकडून गेल्या महिन्याभरापासून ‘रेल नीर’च्या बाटल्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने प्रवाशांसोबत स्टॉलधारकांची देखील डोकेदुखी वाढली आहे. ‘रेल नीर’ ऐवजी दुसऱ्या कुठल्याही कंपनीचे पाणी विक्री केल्यास विक्रेत्याला पाच ते दहा हजारांचा भुर्दंड बसणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ही ‘मोनोपॉली’ रेल्वे स्थानकावर अधिकारी व काही राजकीय पुढाऱ्यांनी हातमिळवणी करून सुरू केल्याचा आरोप होत आहे. यापूर्वी मुंबई येथून ‘रेल नीर’च्या पाणी बॉटल्स योत होत्या. आता मात्र खडका- किन्ही (ता. भुसावळ) येथील एम. आय. डी. सी. मधून या बाटल्या उपलब्ध होत आहेत. पाणी टंचाई असणाऱ्या परिसरात ‘रेल नीर’च्या बाटल्या नेमक्या कोणत्या पाण्याने भरल्या जातात, याबाबत प्रवाशांची उत्सुकता वाढली आहे.

गेल्या महिन्याभरापासून भुसावळ रेल्वे स्थानकांवरती रेल निर कंपनीची पाणी बॉटल ही दुर्गंधीयुक्त येत असल्याने बऱ्याच प्रवाशांची पंधरा रुपयांमध्ये फसवणूक होत आहे.तर कित्येक ग्राहक पाणी बॉटल उघडून पाणी पीत असतांना दुर्गंधीयुक्त असल्याने स्टॉल धारकांशी हुज्जत घालत आहेत.गेल्या महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे.यासंदर्भात मात्र रेल्वे प्रशासन मौन वृत्त घेऊन बसल्याचे दिसत आहे.

कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

खडका- किन्ही (ता. भुसावळ) येथील ज्या कंपनातून या बाटल्या उत्पादीत होत आहेत. त्या पाण्याचे नुमुने तपासणीसाठी स्वतंत्र लॅब उभारणे आवश्यक आहे. जेणे करून तयार झालेले पाणी हे नागरिकांसाठी पिण्यायोग्य आहे की नाही, याची तपासणी होईल. अशी तपासणी झाल्यानंतरच पाणी बॉटल्स विक्री केल्या पाहिजे.

सध्या दुर्गंधीयुक्त पाणी या बाटल्यांमध्ये येत असल्याने हा प्रकार लोकांच्या जीवाशी खेळणारा आहे. त्यामुळे रेल्वे विभागासह अन्न, औषध प्रशासन विभागाने देखील या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दुर्गंधीयुक्त पाणी विकणाऱ्या संबंधित कंपनीची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.

गुरुवारी (ता. ४) सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमधील प्रवाशाने फलाट क्रमांक चारवरुन १५ रुपयात ‘रेल नीर’ची पाण्याची बाटली विकत घेतली. त्यात दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने प्रवाशाने स्टॉल धारकाशी वाद घातला. ज्यामुळे त्या प्रवाशाला त्याचे पैसे परत द्यावे लागले.