बहुजनांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज : ॲड. चंद्रशेखर आझाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲड. चंद्रशेखर आझाद

बहुजनांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज : ॲड. चंद्रशेखर आझाद

नंदुरबार : बाबासाहेबांचे सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही. अजूनही बहुजनांना कमी लेखणारी जाती व्यवस्था मोठी आहे. ते बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाहीत. संविधान बदलण्याचे कटकारस्थान करीत आहेत. संविधान हे बाबासाहेबांचा आत्मा आहे. त्या आत्म्याचा खून म्हणजे आमच्या बापाची हत्या आहे. ती हत्या तुम्ही आम्ही त्यांची लेकरे होऊ देणार नाही. त्याची जबाबदारी बहुजन समाजाने आपल्या खांद्यावर घ्यावी. ८५ टक्के असलेल्या बहुजन समाजाने संघटित होऊन लढा द्यावा, असे आवाहन भीम आर्मीचे प्रमुख ॲड. चंद्रशेखर आझाद यांनी येथे संविधान यात्रेनिमित्त मंगळवारी (ता.२३) झालेल्या सभेत केले.

येथील तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणात झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे, जिल्हाध्यक्ष संजू रगडे यांच्यासह प्रदेश व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ॲड. आझाद पुढे म्हणाले की, गुलामी संस्कृतीत जगलो, गुलामांमध्ये ताकद असते, ती दाखविली गेली नाही म्हणून आजही आपण गुलाम आहोत. महिलांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. तसे झाल्यास बदल नक्कीच घडेल, कारण महिला अधिकार व सहभागी करून घेतल्यास ती ताकद घरापर्यंत पोचते. त्यामुळे पुढच्या तीन पिढ्यांपर्यंत ती ताकद जाते. म्हणून महिलांना आंदोलनातील किंवा न्याय हक्कांच्या लढ्यातील एक घटक बनविला पाहिजे. भारत हा सभ्यता व संस्कृती प्रधान देश आहे. भारताला मजबूत बनविण्यासाठी संविधानातील अधिकार सर्वांना मिळाला पाहिजे.

हेही वाचा: ब्रिटनच्या प्रिन्सची 1.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक

भिमा कोरेगाव प्रकरणात मागील शासनाने चुकीच्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करून बहुजन-दलित समाजावर अन्याय केला आहे. शासनाने ते गुन्हे मागे घेतले पाहिजे. ही आमची मुख्य मागणी आहे. अन्यथा शासनाविरुद्ध आंदोलन करावे लागेल. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी यांसारखे विचारवंत, लेखक, पत्रकारांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. २८ नोव्हेंबर हा महात्मा फुले यांचा स्मृती दिन असून त्याच दिवशी खरा शिक्षक दिन साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

बहुजनांनो, परिस्थिती चांगली नाही, अजूनही मतदानाचा अधिकार तुम्ही समजून घ्या, त्याच्यात मोठी ताकद आहे. ज्या दिवशी तुम्ही ती संघटित होऊन ताकद दाखविणार त्या दिवशी आपली परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बहुजन समाजाने एकसंध झाले पाहिजे, तसे झाले तर येणारा काळ आपला आहे. ही लढाई शासक व सेवकांची आहे. सेवकांनी ताकद दाखविली तर सेवक शासक बनू शकेल असेही, ते म्‍हणाले. प्रा. पिंपळे यांनी सूत्रसंचालन केले.

loading image
go to top