Sant Muktabai Punyatithi : तापिचिये तीरी महतग्राम थोर.. असे सोमेश्‍वर पुरातन! | Baisakh Pure Dashami means day of sant Muktabai punyatithi jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Picture of Muktabai giving paduka while disappearing.

Sant Muktabai Punyatithi : तापिचिये तीरी महतग्राम थोर.. असे सोमेश्‍वर पुरातन!

Jalgaon News : वैशाख शुद्ध दशमी अर्थात्‌ संत मुक्ताबाई अंतर्धान पावल्याचा दिवस. नामदेवांच्या गाथेत यासंबंधी व स्थळाचे वर्णन आहे. तापी तीराचे आध्यात्मिक महत्त्व या अंगाने विशद करताना मेहूणचे सोमेश्‍वर मंदिर आणि मुक्ताईचा परस्पर संबंधही अधोरेखित होतो. (Baisakh Pure Dashami means day of sant Muktabai punyatithi jalgaon news)

संत मुक्ताबाईच्या चरित्राचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांनी ॲड. गोपाल चौधरी यांच्या मुक्ताईगाथेत या विषयावर स्वतंत्र अभ्यासपूर्ण विश्‍लेषण केलेले आहे.

भावंडांच्या संतपणाची महती

डॉ. पाटील यांनी या गाथेत संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्‍वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या चारही भावंडांच्या संतपणाची महती वर्णिली आहे. तसेच, चारही भावंडांनी घेतलेल्या समाधी, त्याची वेळ, काळ आणि स्थळ याचा महिमाही वर्णिला आहे.

मुक्ताईनगरीचा संबंध कसा?

संत ज्ञानेश्‍वर आणि त्यांच्या भावंडांचा रहिवास मुख्यत्वे आपेगाव, आळंदी, पैठण आदी ठिकाणी राहिलाय. पैकी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्‍वर, सोपानदेव यांची समाधी त्या त्या परिसरात झाली. मग, मुक्ताबाईची समाधी अथवा अंतर्धान स्थळ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर कसे? असा प्रश्‍न स्वाभाविकतः समोर येतो. त्याचे समाधान नामदेवांच्या गाथेत सापडते.

अंतर्धानाची कथा

या गाथेत मुक्ताबाई अंतर्धान पावल्याची कथा वर्णिली आहे. त्याचे सोप्या भाषेत विश्‍लेषण डॉ. पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार नामदेवांनी ‘तापिचिये तीरी महतग्राम थोर.. असे सोमेश्‍वर पुरातन!’ असे स्थळवर्णन केले आहे. मुक्ताईनगरजवळील मेहूण गावानजिक तापी व पूर्णा नदीचा संगम आहे. संगमावर सोमेश्‍वराचे पुरातन मंदिर असून, या पवित्र स्थळानजिक मुक्ताई अंतर्धान पावतील, असे संकेत पांडुरंगाने दिल्याचे नामदेव गाथेत म्हटलेय आणि मुक्ताबाईंच्या बाबतीत तेच झाले.

वैशाख शुद्ध दशमीला शके १२१९ मध्ये मुक्ताबाई १७ वर्षे ७ महीने २४ दिवसांच्या वयात असंख्य भक्तांच्या उपस्थितीत अदृश्य झाल्या. त्यावेळी प्रचंड वादळ, विजांच्या कडकडाटात मुक्ताबाई लुप्त झाल्या. त्याचेही,

‘कडाडली वीज निरंजनी जेव्हां.. मुक्ताई तेव्हां गुप्त झाली!’ असे वर्णन या गाथेत आढळते. ही गाथा मुक्ताईनगर, मेहूणचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करते. आज संत मुक्ताबाईची पुण्यतिथी. त्यानिमित्त डॉ जगदीश पाटील यांनी केलेले हे विश्‍लेषण संदर्भग्राह्य ठरावे.