esakal | निर्यातक्षम केळीला विक्रमी भावाची चिन्हे; अडीच लाख क्विंटल केळी निर्यात होणार 

बोलून बातमी शोधा

निर्यातक्षम केळीला विक्रमी भावाची चिन्हे; अडीच लाख क्विंटल केळी निर्यात होणार }

आंध्र प्रदेशातील केळी गेल्या वर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच संपुष्टात आल्याने तेथील निर्यातदार व्यापारी यापूर्वीच जिल्ह्यात आले आहेत.

निर्यातक्षम केळीला विक्रमी भावाची चिन्हे; अडीच लाख क्विंटल केळी निर्यात होणार 
sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : परिसरात दर्जेदार आणि निर्यातक्षम केळीची कापणी वाढू लागली असून, निर्यातीचा वेगही वाढत आहे. या वर्षी मागणीपेक्षा कापणीयोग्य आणि निर्यातक्षम केळी कमी असल्याने केळीला विक्रमी भाव मिळण्याची चिन्हे आहेत. या वर्षी किमान दोन-अडीच लाख क्विंटल केळीची निर्यात होईल, अशी स्थिती आहे. या आठवड्यातच निर्यातीला गती येणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे बसलेल्या फटक्यातून केळी उत्पादक शेतकरी काही प्रमाणात सावरतील, अशी चिन्हे आहेत


आगामी काळात खानदेशातील केळीच्या मागणीत वाढ होणार आहे. आंध्र प्रदेशातील केळी गेल्या वर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच संपुष्टात आल्याने तेथील निर्यातदार व्यापारी यापूर्वीच जिल्ह्यात आले आहेत. इराक, इराण आणि अफगाणिस्तान या देशांमधून केळीला मोठी मागणी आहे. १४ एप्रिलपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. त्या काळातही केळीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. 

कापणीयोग्य केळीची कमतरता 
गेल्या वर्षी कोरोनामुळे केळीला तीनशे रुपये क्विंटललाही कोणी खरेदी करत नव्हते, अशी स्थिती होती. त्यानंतर केळीवर पडलेल्या सीएमव्ही या रोगामुळेही मोठ्या प्रमाणावर केळी उपटून फेकावी लागली आहे. या सर्व कारणांमुळे यंदा खूपच कमी केळी कापणीसाठी उपलब्ध होणार आहे. 

विक्रमी भाव मिळणार 
निर्यातक्षम केळीला सुमारे दोनशे रुपये क्विंटलने जास्तीचा भाव मिळत आहे. सध्या जिल्ह्यातून रोज तीन ते चार कंटेनर म्हणजे सुमारे आठशे क्विंटल केळीची निर्यात होत आहे. बाजार समितीने केळीचे भाव सुमारे बाराशे रुपये क्विंटलपर्यंत जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात चौदाशे रुपये क्विंटलपर्यंत निर्यातक्षम केळीची खरेदी विक्री होत आहे. रावेर तालुक्यातील तांदळवाडी येथील महाजन बनाना एक्स्पोर्ट्स आणि एकदंत बनाना एक्स्पोर्ट्स, अटवाडा येथील रुची बनाना एक्स्पोर्ट्स आणि रावेर येथील महाराष्ट्र बनाना, सावदा येथील असंख्य निर्यातदार फर्मस यांच्या माध्यमातून असंख्य निर्यातदार व्यापारी जिल्ह्यात आणि तालुक्यात तळ ठोकून आहेत. 


केळी आयातीसाठी अरब देश मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहे. या वर्षी जिल्ह्यातून किमान दोन हजार कंटेनर म्हणजे चार लाख क्विंटल केळीला मागणी आहे. मात्र, इतकी निर्यातक्षम केळी या वर्षी उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे. दोन हजार कंटेनर केळी निर्यात झाली तरीही तिची किंमत जास्तीत जास्त ५० कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे. द्राक्षाची निर्यात पाहता केळीची निर्यात नगण्यच आहे. ही होत असलेली निर्यात खासगी कंपन्यांच्या प्रयत्नाने होत आहे. केळी निर्यातीसाठी केंद्र सरकारने आणि स्थानिक खासदारांनी पुढाकार घेऊन आधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा आहे.