शेतीला 2 दिवसांपासून वीज नसल्याने केळी धोक्यात; शेतकरी संतप्त

Banana Farming
Banana Farmingesakal


रावेर (जि. जळगाव) : गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेचे तापमान ४४ अंशांवर पोहोचलेले आहे. असे असताना वीज वितरण कंपनीकडून शून्य भारनियमनाच्या नावाखाली गेल्या दोन दिवसांत शेतीसाठी फक्त तीन- चार तास वीज देण्यात आली. यामुळे केळी पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे काढणीवर येणारे केळी पीक व केळीच्या दर्जावर याचा परिणाम होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. या मुळे तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतीसाठी ठरवून दिलेल्या नियमानुसार वीजपुरवठा करावा, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णतेचे तपमान तालुक्यात ४२ ते ४४-४५ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून शेतीसाठी विजेची वेळ नेमून दिल्यानंतरही शून्य भारनियमन व कोळसा उपलब्ध नाही. या विविध कारणावरून वीज भारनियमन होत आहे. यामुळे पाण्याअभावी केळी पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. तालुक्यातील सिंगत, तांदलवाडी, उधळी, नेहते, केऱ्हाळे, मोरगाव यासह तालुक्यातील विजेचे फीडर बंद आहेत. अजून उन्हाळ्याचे दोन, अडीच महिने बाकी आहेत.

Banana Farming
शेतकऱ्यांमागे शुक्लकाष्ठ; पाणीटंचाईमुळे कांद्याची वाढ खुंटली

केळीवर परिणाम

गेल्या दोन दिवसांत वीज वितरण कंपनीतर्फे रात्री तीन, चार तासच वीजपुरवठा केला. वाढत्या तपमानामुळे व पाण्याअभावी केळीची पाने मोडू लागली आहे. केळीचे घड सटकण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. केळीच्या दर्जावर याचा परिणाम होऊन केळी उत्पादन शेतकऱ्यांच्या केळीचे नुकसान होऊन वर्षभर मशागत करून हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी मार्चअखेर केळीच्या टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली आहे.

वीज वितरण कंपनीने दखल घ्यावी

वीज वितरण कंपनीने नेमून दिलेल्या वेळेनुसार शेतीला वीजपुरवठा करावा, अन्यथा केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. विजेबाबत व वीज कंपनीने गंभीरपणे दखल घ्यावी, अशी मागणी तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

आमदार चौधरींकडून दखल

केळीला उन्हाळ्यात जास्त पाण्याची आवश्यकता असल्याने रात्रीचे भारनियमन करू नये, अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून केली. आमदार चौधरी आज दिल्लीहून येताच त्यांना तालुक्यातील व परिसरातील भारनियमनाबाबत माहिती मिळाली. त्यांनी ताबडतोब ऊर्जामंत्री राऊत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रात्रीचे भारनिमयन बंद करण्याची विनंती केली. एरवी रावेर तालुक्यात दिवसा आणि रात्री ८-८ तास वीजपुरवठा केला जातो. मात्र मागील दोन-तीन दिवसांत विजेबाबतच्या आकस्मिक कारणामुळे रात्रीचे भारनियमन करावे लागले आहे.

''पाण्याअभावी केळीची स्थिती बिकट झाली आहे. येत्या एक-दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.'' - प्रमोद चौधरी, केळी उत्पादक शेतकरी व सरपंच, सिंगत, ता. रावेर

Banana Farming
'एप्रिल फुल बनाया...' म्हणत नाशिककरांनी अनुभवले रंजक किस्से

''मंगळवारी (ता. ५) फीडरच्या अडचणींमुळे काही ठिकाणी वीज नव्हती. मात्र बुधवारी (ता. ६) रात्री शून्य भारनियमन होते. यामुळे वीज नव्हती. वरिष्ठ पातळीवरून भारनियमन केव्हा होईल हे आम्ही सांगू शकत नाही. वीज उपलब्धतेनुसार शेतीला वीज देण्यात येईल.'' - अनिल पाटील, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, रावेर भाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com