
Bhongrya Bazar : उनपदेव येथे भोंगऱ्या बाजार उत्साहात; आदिवासी संस्कृतीचे दर्शन
अडावद (जि. जळगाव) : आदिवासी संकृतीचे जतन करणारा भोंगऱ्या बाजार (Bhongrya Bazar) उनपदेव (ता. चोपडा) येथे सोमवारी (ता. ६) हर्षोत्साहात व चैतन्यमय वातावरणात पार पडला. भोंगऱ्या बाजारात झालेल्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप आले होते. (Bhongrya Bazar celebrated by tribal people in chopda jalgaon news)
सुमारे साठ हजारांहून अधिक ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती. सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगतच्या गावांसह जिल्ह्यातील शेकडो पाडे, वस्तींवरील हजारो आदिवासी बांधव आपल्या कुटुंबीयांसह या बाजारात आले होते. विविध वस्तूंच्या खरेदी- विक्रीतून बाजारात लाखोंची उलाढाल झाली.
आदिवासींचे विविध रंगातील पेहराव तसेच ढोलताश्यांचा गजरातील सामुहिक नृत्य हे भोंगऱ्या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरले होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी देखील भोंगऱ्या बाजारात हजेरी लावली. सोमवारी (ता. ६) सकाळी साडेअकराला लोकनियुक्त सरपंच भावना माळी , सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा, मेलानेच्या लोकनियुक्त सरपंच लालबाई पावरा, आदिवासी सेवक
संजीव शिरसाठ, प्रताप पावरा, देवसिंग पावरा, शेवरे बुद्रूक येथील गणदास बारेला यांच्याहस्ते मानाच्या ढोलाचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमोद बाविस्कर, खेलसिंग बारेला, दिनेश बारेला, माजी सरपंच यासू बारेला, आदर्श सोनवणे, वनगावच्या पोलिस पाटील नायजबाई पावरा, मेलानेचे उपसरपंच दिलीप पावरा यांच्यासह आदिवासी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
कलाविष्कारांचे सादरीकरण
बाजारात विविध पाडे, वस्ती तसेच ठिकठिकाणचे आदिवासी कुटुंबीय पारंपरिक बैलगाडीसह ट्रॅक्टर, रिक्षा तसेच अन्य वाहनांनी भोंगऱ्या बाजारात दाखल झाले. दुपारी बारापासून आदिवासी बांधव आपआपल्या गटाने नृत्य करीत होते. यावेळी बासरी वादन, घुंगरू आदी कलाविष्कारातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले.
सायंकाळी उशीरापर्यंत बाजारात हा उत्साह टिकून होता. मध्यभागी मोठा ढोल, ताटली वाजवून बासरी व त्याभोवती युवक युवतींसह अबालवृद्ध गोलरिंगण करून नाचण्याचा आनंद घेतला. यावेळी वेगवेगळ्या पथकांनी आपली कला विविध अंगानी सादर करुन उपस्थितीतांची दाद मिळवली.
लाखोंची उलाढाल
भोंगऱ्या बाजारात स्पेशल गुळाची जिलेबी, गोडशेवची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे दिसून आले. याशिवाय पान ठेल्यावरील कलकत्ता मिठा पान, कुल्फी तसेच शीतपेयांची देखील चांगली विक्री झाली. बाजारात हातावर गोंधून घेण्यासाठी आदिवासी महिलांची गर्जी झाली होती. बाजारात फोटो काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी साहित्य, कपडे, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने थाटली होती.
आदिवासी बांधवानी भोंगऱ्या बाजारात केलेल्या विविध वस्तूंच्या खरेदीमुळे लाखोंची उलाढाल झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील आमोदा, गाढोदा, पडसोद, भोकर, वर्डी , भादली, किनोद, कठोरा, साकळी, यावल, धानोरा, किनगावसह सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगतच्या गाढऱ्या, जामन्या, खर्डी, धुपामाय, डुकर्णे, चांदण्यातलाव, मोरमळी, मेलाणा, गायपाणी, शेणपाणी, चिचपाणी, कुंड्यापाणी, वैजापूर, शेवारा, देव्हारी आदींसह उनपदेव लगतच्या जवळपास २५ पाडे व वस्तीतील हजारो आदिवासी कुटुंबीय भोंगऱ्या बाजारात दाखल झालेले होते.
यशस्वितेसाठी आमदार लता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाडवी (बोरमळी), गेलसिंग बारेला, प्रताप बारेला (शेवरे बुद्रूक), बालसिंग बारेला (धुपामाय), संजय बारेला (पानशेवडी), सागर पावरा, सायसिंग बारेला (कुंड्यापाणी), गुलाब पावरा, ग्रामपंचायत सदस्य विनेश पावरा (मालापूर), बाजीराव पावरा (गंडारे), ढेमसिंग पवार, मोहन बारेला (कर्जाने), दिनेश बारेला (रामजी पाडा), गजीराम पावरा, भाया पावरा आदींचे सहकार्य लाभले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, कर्मचारी जगदीश कोळंबे, कदीर शेख, शुभम बाविस्कर आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.
आदिवासी संस्कृतीचे दर्शन
सातपुड्यासह इतर अन्य ठिकाणच्या तसेच मध्यप्रदेशातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या भागात आलेले आदिवासी बांधव देहभान विसरून भोंगऱ्या बाजारात बेधुंदपणे नाचताना दिसून आले. सायंकाळी उशीरापर्यंत चाललेल्या या बाजारात आदिवासी शैलीतील खास ढोल वादन व बासरीच्या सुरांमुळे वातावरण निर्मिती झाली होती.
जवळपास ५२ ढोल पथक सहभागी झाले होते. ढोलवादनाचे प्रथम तीन हजारांचे बक्षिस शेवरे पाडा येथील पथकाने पटकावले. सायंकाळी हजारो आदिवासी बांधवांनी एकमेकांना गुलाल लावून गुळ, फुटाणे, हार, कंगणच्या प्रसादाची देवाणघेवाण केली. यावेळी सर्वांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आपापल्या पाड्या, वस्त्यांकडे प्रस्थान केले.