BHR Case : जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी; निर्णयाकडे जळगावकरांचे लक्ष लागून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BHR Scam

BHR Case : जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी; निर्णयाकडे जळगावकरांचे लक्ष लागून

जळगाव : बीएचआर (BHR) गैरव्यवहार प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. प्रवीण चव्हाण, फॉरेन्सीक ऑडिटर शेखर सोनाळकर यांच्या जामीन अर्जांवर जिल्‍हा न्यायालयात गुरुवारी (ता. १६) सुनावणी होणार आहे. (bhr case bail application will be heard again today people attention towards decision jalgaon news)

बचाव पक्षाच्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर सरकार पक्ष व फिर्यादीतर्फे युक्तिवाद झाला असून, जामिनावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या ठेवपावत्यांचे मॅचिंग आणि मालमत्ता खरेदी प्रकरणात डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुनील झंवर यांच्या

जामिनासाठी मदत करण्यासाठी मुलगा सूरज झंवर यांच्याकडून उदय पवार याच्या माध्यमातून सरकारी अभियोक्ता ॲड. प्रवीण चव्हाण, लेखा परीक्षक शेखर सोनाळकर यांनी १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल आहे.

शेखर सोनाळकर अंतरिम अटकपूर्व जामिनावर असून, त्यांचा जामीन कायम करावा, यासाठी त्यांनी अर्ज केला होता. प्रमुख संशयित ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यातर्फे अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

शुक्रवार (ता. १०)पासून कामाला सुरवात झाली असून, पहिल्याच दिवशी बचाव पक्षाने प्रदीर्घ युक्तिवाद केला. तद्‌नंतर सलग दोन दिवस सरकार पक्ष आणि फिर्यादीतर्फे बाजू मांडण्यात आली.

दोन्ही पक्षाचा युक्तिवाद जवळपास पूर्णत्वास आला आहे. उच्च न्यायालयांसह, सर्वोच्च न्यायालयाचे दाखले दोन्ही पक्षाने सादर केले आहेत. संशयितांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर नेमका काय निर्णय होतो, याकडे जळगावकरांचे लक्ष लागून आहे.

उदय पवारांचा अर्ज सादर

ॲड. प्रवीण चव्हाण, लेखा परीक्षक शेखर सोनाळकर यांच्यापाठोपाठ चाळीसगाव येथील मद्य व्यवसायिक उदय पवार यांच्यातर्फे जिल्‍हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर झाला आहे. सरकार पक्षाने सादर केलेल्या पुराव्यानुसार

आणि फिर्यादीने तक्रारीत उदय पवार यांच्याच मोबाईलवरील सिग्नल ॲपद्वारे ॲड. चव्हाण यांनी खंडणी मागितल्याचे व ॲड. चव्हाण आणि सोनाळकरांशी बोलणे झाल्याचे नमूद आहे. सूरज झंवर यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी मध्यस्थी म्हणून उदय पवार यांनी २० लाख घेतल्याचे सांगण्यात आले.