BHR Case : ॲड. चव्हाण, सोनाळकरांना अटकपूर्व जामीन मंजूर; पुराव्यांवर अवलंबून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BHR Patsanstha Fraud Case

BHR Case : ॲड. चव्हाण, सोनाळकरांना अटकपूर्व जामीन मंजूर; पुराव्यांवर अवलंबून

जळगाव : बीएचआर (BHR) ठेव पावती मॅचिंग आणि मालमत्ता विक्रीप्रकरणी अटकेतील सुनील झंवर यांना मदत करण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात ॲड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर यांना जिल्‍हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. (bhr case Pre arrest bail granted to advocate Chavan Sonalkar jalgaon news)

गुन्ह्यात नियुक्त ‘एसआयटी’ पथकाचा तपास आता कागदोपत्री दस्तऐवज आणि पुराव्यांवर अवलंबून आहे. संशयितांची न्यायालयाच्या सूचनेनुसार विचारपूस होण्याची शक्यता आहे.

तपासाची माहिती सादर

जिल्‍हा न्यायालयात फिर्यादी सूरज झंवर यांच्यासह एकूण सहा जणांचे जबाब, त्या आधारे केलेल्या चौकशीत निष्पन्न झालेले पुरावे, इलेक्ट्रानिक्स एव्हीडन्स, संभाषणाची टेप, व्हिडिओ क्लीप आणि शास्त्रोक्त पद्धतीने उपलब्ध माहिती न्यायालयात सादर करण्यात आली.

प्रथमदर्शनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाला दिशा मिळणार असून, त्यासाठी आवश्यक बाबी तपास यंत्रणेने विस्तृत लेखी म्हणणे निरीक्षक संदीप पाटील यांनी सादर केले. त्या आधारे बचाव पक्षाने तब्बल तीन तास, तर सरकार पक्षानेही तीन तास सलग युक्तिवाद केला.

दरम्यान, बीएचआर ठेव पावती मॅचिंग आणि पतसंस्थेच्या मिळकती खरेदी केल्याप्रकरणी सुनील झंवर, त्यांचा मुलगा सूरज यांना अटक झाली होती. सूरज याचा जामीन मंजूर झाला. नंतर तो वडील सुनील झंवर यांच्या जामिनासाठी प्रयत्नशील होता.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

त्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासाठी चाळीसगाव येथील मद्य व्यावसायिक उदय पवार याने एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतली. याप्रकरणी सुरवातीला डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल झाला. नंतर गुन्ह्याचे घटनास्थळ चाळीसगाव असल्याने पुणे पोलिसांनी तो गुन्हा जळगाव पोलिसांकडे वर्ग केला.

चाळीसगाव पोलिसांत शून्य क्रमांकाने वर्ग गुन्ह्याचा तपास सुरवातील स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. नंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी विशेष ‘एसआयटी’ पथक गठीत केले. या पथकाने गुह्यातील फिर्यादी सूरज झंवर, सुनील झंवर, आयुष मनियार, विशाल पाटील, तेजस मोरे, दीपक ठक्कर यांचे जबाब नोंदवून घेतले.

त्या आधारे मूळ घटनास्थळ असलेल्या चाळीसगाव येथून तपासाला सुरवात केली. ॲड. चव्हाण यांना उदय पवार यांच्या नावे ज्या ट्रॅव्हल्स् एजन्सीकडून पार्सल पाठविले होते. त्याच्या पावत्या, स्पाय कॅमेऱ्याद्वारे चित्रित ध्वनिचित्रफितीसह इतर पुरावे तपासधिकाऱ्यांनी संकलित केले होते.

त्याचा लेखाजोखा न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात सादर करून तपास पथक व सरकार पक्षातर्फे अटकपूर्व जामिनाला तीव्र विरेाध केला होता. सरकार पक्षातर्फे ॲड. सुरेंद्र काबरा, बचाव पक्षार्फे ॲड. गोपाल जळमकर, फिर्यादीतर्फे ॲड. सागर चित्रे, ॲड. पंकज पाटील काम पाहत होते.