
BHR Case : 18 कारणांसह इलेक्ट्रॉनिक पुरावे अन् तथ्यांवर युक्तिवाद; जामिनावर आज सुनावणी
जळगाव : बीएचआर संस्थेतील ठेव पावत्या मॅचिंग प्रकरणात झंवर पिता-पुत्राकडून एक कोटी २२ लाख खंडणी उकळल्याप्रकरणी तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण, फॉरेन्सिक ऑडिटर शेखर सोनाळकर यांच्या अटकपूर्व जामिनावर जिल्हा न्यायालयात शुक्रवारी (ता. १०) न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. (BHR extortion case 18 Arguments on Electronic Evidence Facts with Reasons Today jalgaon news)
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या ठेव पावत्या कर्ज प्रकरणात मॅचिंग करून कर्जफेड आणि पतसंस्थच्या मालमत्ता विक्रीप्रकरणी अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, सूरज झंवर यांच्यासह इतरांनाही अटक झाली होती. कारागृहात पाच महिने काढल्यानंतर सूरज झंवर यांची जामिनावर सुटका झाली.
वडील सुनील झंवर यांच्या जामिनासाठी मदत करण्यासाठी राज्य शासनातर्फे नियुक्त विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ॲड. चव्हाण, लेखापरीक्षक शेखर सोनाळकर आणि प्रत्यक्षात पैसे घेणारा उदय पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशाने विशेष तपास पथकाची नियुक्ती (एसआयटी) झाली आहे. प्रथम संशयित ॲड. चव्हाण यांच्यातर्फे जामीन अर्ज दाखल झाला आहे. शेखर सोनाळकर यांचा अंतरिम जामीन कायम करण्यासाठी दाखल अर्जावर न्यायाधीश मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, मंगळवारी (ता. ७) सरकार पक्षाने आपले म्हणणे मांडले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
तपासाधिकाऱ्यांनी मांडलेले पुरावे
-सुनील झंवर यांच्या व्हॅट्सॲपवर उदय पवार याने ६ मार्च २२ ला पाठवलेला संदेश, त्यासोबतच मिस्ड कॉल, साक्षीदार तेजस मोरे याने ॲड. मोहित माहिमतुरा यांचा स्क्रीन शॉट
-ॲड. प्रवीण चव्हाण यांना उदय पवार याने टपाल पावतीची फोटो प्रिंट, चाळीसगाव येथील अंबिका टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सचे मालक नितीन कासार यांचा जबाब. सोबतच उदय पवार याने ॲड. चव्हाण यांना पाठविलेल्या पार्सलच्या पावतीचे पुस्तक
-उदय पवार याच्या मोबाईलद्वारे सिग्नल ॲपच्या माध्यमातून ॲड. चव्हाण, शेखर सोनाळकर यांच्याशी संभाषण झाल्याचा डीएटीफ सायबर सिक्यिुरिटी सर्व्हिसेसचा अहवाल
-उदय पवार-सूरज झंवर यांच्या भेटीचे फोटो, व्हिडिओ चित्रण क्लीप आदी माहिती न्यायालयात सादर करण्यात येऊन शपथपात्र दाखल
-संशयित-फिर्यादींचे मोबाईल लोकेशनसह प्रवासाबाबत शास्त्रीय पृथःक्करण अहवाल
जामिनाला विरोध असा
-संशयित ॲड. प्रवीण चव्हाण अनुभवी वकील असून, त्यांचा न्यायक्षेत्रात दबदबा आहे. शहर पोलिस ठाण्यात मविप्र प्रकरणात दाखल गुन्ह्यात ॲड. प्रवीण चव्हाण संशयित म्हणून निष्पन्न झाल्याचे शहर पोलिसांनी कळविले आहे. शेखर सोनाळकर यांच्याविरुद्ध इंदूर येथील तुकोगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
-तिघा संशयितांनी सिग्नल ॲपचा वापर करून बोलणे केल्याने त्यांचे मोबाईल जप्त करणे आहे
-संशयितांचे आवाजाचे नमुने संकलित करायचे आहेत, म्हणून संशयितांची कोठडी आवश्यक
-तिघा संशयितांनी खंडणीपोटी घेतलेल्या एक कोटी २२ लाखांची रक्कम कशी वाटून घेतली, याची चौकशी गरजेची
-मध्यस्थी संशयिताने स्वतःसाठी २० लाख व हवाला-कुरिअरसाठी दोन लाख घेतले असून, त्यापोटी ट्रॅव्हल्स पावत्यांची खातरजमा करणे आहे
-प्रमुख संशयित ॲड. चव्हाण यांचा हस्तक ॲड. मोहित माहिमतुरा याचा ठावठिकाणा संशयिताकडून माहिती करून घ्यायची आहे
-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या इलेक्ट्रॉनिक पुरावे (पेन ड्राइव्ह) व संभाषणातील सहभाग पाहता संशयितांनी इतर गुन्हे केल्याचा शोध घेणे आवश्यक
-संशयितांना जामीन मंजूर झाल्यास ते गुन्ह्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे, कागदपत्रे नष्ट करण्याची शक्यता
-फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबात नमूद घटनाक्रम, संकलित पुरावे आणि झालेला उशीर यांचा ताळमेळ जमवणे, अशा अठरा करणांचा लेखाजोखा सरकार पक्ष व तपासाधिकाऱ्यांनी मांडला असून, त्या आधारे दोन्ही पक्षांतर्फे बाजू मांडण्यात येऊन युक्तिवादानंतर जामीन अर्जावर निर्णय होईल. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र काबरा, बचाव पक्षातर्फे ॲड. गोपाल जळमकर आणि फिर्यादीतर्फे ॲड. सागर चित्रे काम पाहत आहेत.