
Blood Donation : मध्यरात्री रक्तदान करून गर्भवतीला दिले जीवदान!
पाचोरा (जि. जळगाव) : शहरातील एका हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेस मध्यरात्री दोनच्या सुमारास रक्तदान (Blood Donation) करून जीवदान
देणाऱ्या रक्तदाते सुनील माळी यांचे कौतुक होत आहे. (blood donor Sunil Mali donated blood to pregnant woman in hospital around 2 midnight jalgaon news)
पिचर्डे (ता. भडगाव) येथील छाया गायकवाड ही गर्भवती महिला बाळंतपणासाठी येथील लिलावती हॉस्पिटलला दाखल झाली. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि रुग्णासोबत तिची अशिक्षित वहिनी अशा परिस्थितीत या महिलेस 'ओ निगेटिव्ह' दुर्मिळ रक्तगटाची गरज पडली.
मध्यरात्री कुणाशी संपर्क साधावा व गर्भवती महिलेस जीवदान द्यावे? या विचारात असलेल्यांनी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याशी संपर्क केल्यावर ते तातडीने हॉस्पिटलमध्ये आले व त्यांनी संपर्कातील डाॅक्टर व मित्रांशी संपर्क करून रात्री दोनला सामाजिक कार्यकर्ते सुनील माळी यांना झोपेतून उठवले आणि रक्तदानासाठी बोलावले.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
माळी या रक्तदात्याच्या रक्तामुळे छाया गायकवाड यांची प्रसूती सुकर झाली. गोंडस बाळाला त्यांनी जन्म दिला. यावेळी सचिन पाटील, ललित पाटील, शुभम मराठे उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सकाळी छाया गायकवाड यांच्या नातेवाईकांनी सचिन सोमवंशी, सुनील माळी यांची भेट घेऊन आभार मानले. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे, याचा प्रत्यय यातून आला.