Board Exam : इंग्रजीला कॉपी चालली, कारवाई मात्र नाही ! बारावीच्‍या परीक्षेला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher, Center Invigilator while checking and releasing the student at the examination center.

Board Exam : इंग्रजीला कॉपी चालली, कारवाई मात्र नाही ! बारावीच्‍या परीक्षेला सुरवात

जळगाव : इंग्रजीचा (English) पेपरला दरवर्षी कॉपी केल्याप्रकरणी विद्यार्थी ‘डिबार’ (कारवाई) होण्याची प्रकरणे होतात. इंग्रजीचा पेपर अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठीण जातो.

यामुळे या पेपरला हमखास कॉप्या चालतात. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई होते. (board exam Although there were no copying cases at city centre clandestine copying was rampant jalgaon news)

यंदा मात्र बारावीच्या परीक्षेत पहिला पेपर इंग्रजीचा असताना, एकही विद्यार्थी डिबार झाला नाही.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्‍या परीक्षेला मंगळवार (ता. २१)पासून सुरवात झाली. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ७६ केंद्रांवर ४७ हजार २१४ विद्यार्थी बसले आहेत.

मंगळवारी कठीण समजला जाणारा इंग्रजीचा पेपर झाला. शहरातील केंद्रांवर एकही कॉपी केस झाली नसली तरी छुप्या पद्धतीने सर्रासपणे कॉपीचे प्रकार झाले. मात्र, परीक्षा काळात केंद्राबाहेर होणारा जमावावर अंकुश घालण्यास शिक्षण विभागाच्या मदतीने पोलिसांना यश आले.

शेवटच्‍या तासात कॉपी

विभागीय शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान हाती घेतले असून, विद्यार्थ्यांकडून कॉपी न करण्याची शपथ घेतली होती. मात्र, इंग्रजीच्‍या पेपरला दरवर्षी ही शपथ मोडीत निघत असते. बहुतांश परीक्षा केंद्रावर छुप्या पद्धतीने कॉपीचे प्रकार घडले. काही केद्रांवर बैठे पथकांच्या नजरा चुकवून शेवटच्‍या तासात खूप कॉपी चालली. वर्गांच्या खिडक्यांमध्‍येही कॉपी लावण्यात आल्याचे चित्रही दिसून आले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

परीक्षा केंद्रावर गर्दी

बारावीचा पहिलाच पेपर असल्‍याने परीक्षा सुरू होण्याआधी केंद्रांवर पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळाली. मात्र, त्यानंतर शुकशुकाट दिसून आला. सहा भरारी पथकांनी शहरासह जिल्ह्यातील केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच बैठे पथकही केंद्रावर तैनात होते.

तासभर आधीच प्रवेश

इंग्रजीचा पेपर सकाळी अकराला सुरू होणार होता. मात्र, प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करूनच त्याला केंद्रात प्रवेश देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना साडेनऊ पासून केंद्रावर बोलाविले होते. साडेनऊ ते साडे दहा या एका तासात तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांना आत सोडण्यात आले.

बोर्डाची पहिलीच परीक्षा अन्‌ पालकांना टेंशन

यंदा बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची दहावीची बोर्डाची परीक्षा कोरोनामुळे झाली नव्हती. त्यामुळे त्यांना बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव नाही. परिणामी, पालकांनी या परीक्षेचे अधिक टेंशन घेतल्याचे दिसत होते. केंद्रावर विद्यार्थ्याला सोडायला आलेले काही पालक, तर पेपर सुटेपर्यंत केंद्र परिसरातच थांबून असल्याचे चित्र दिसून आले. विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच गर्दी असे चित्र केंद्राजवळ निर्माण झाले होते.

प्रश्‍नपत्रिकेतील चुकीमुळे गोंधळ

आजच्या इंग्रजीच्या प्रश्‍नपत्रिकेत प्रश्‍न क्रमांक तीनमध्ये काहीतरी चूक असल्याचे विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. या त्रुटीमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. काही केंद्रांवर इंग्रजी विषयातील तज्ज्ञांना बोलाविण्यात आले, त्यांनाही ही त्रुटी लक्षात आली. मात्र, प्रश्‍न सोडवा, त्या प्रश्‍नाचा किमान क्रमांक लिहून ठेवा, गुण मिळतील, असे केंद्रांवर सांगण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अर्थात, नंतर बोर्डानेही ही चूक मान्य केल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकल्यात.