Jalgaon Crime News : कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना, नायब तहसीलदाराची लाचखोरी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bribe taken by Naib Tehsildar from sand traders jalgaon news

Jalgaon Crime News : कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना, नायब तहसीलदाराची लाचखोरी!

धरणगाव (जि. जळगाव) : अवैध वाळू वाहतूक करताना कुठलीही कारवाई करू नये आणि वाहतूक सुरू राहू देण्यासाठी वाळू व्यावसायिकाकडून २५ हजारांची लाच (Bribe) घेताना धरणगाव येथील कोतवालासह त्याला प्रोत्साहन देणाऱ्या नायब तहसीलदाराला गुरुवारी (ता. १६) अटक करण्यात आली. (bribe taken by Naib Tehsildar from sand traders jalgaon news)

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू असून, महसूलसह सर्व कार्यालये ओस पडली असताना, कोतवाल व नायब तहसीलदाराने हा प्रकार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सध्या वाळूगटाचे लिलाव झाले नसताना अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महसूलसह पोलिस विभागाचे त्याला आशीर्वाद असल्याची तक्रार नेहमीच समोर येत असते.

अशातच धरणगाव तहसील कार्यालयात महसूल विभागातील नायब तहसीलदार जयवंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे याने तक्रारदारास डंपरने वाळू वाहतूक सुरू राहू देण्यासाठी संबंधित वाळू व्यावसायिकाकडे ३० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

मात्र, तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दिली. त्यावरून गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी त्यांच्या पथकासह लाच घेताना कोतवालासह नायब तहसीलदारांना ताब्यात घेतले आहे.

कारवाई करणाऱ्या पथकात सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, ईश्‍वर धनगर, सचिन चाटे, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी यांचा समावेश आहे.