
कोरोनात जोडीदार गमावलेल्यांच्या जीवनात पालवी
जळगाव : कोरोनात पती गमावलेल्या वहिनीच्या पुनर्विवाहासाठी दिराने पुढाकार घेत जोडीदार शोधून काढला. विशेष म्हणजे नियोजित वराची पत्नीही कोरोनातच मृत्युमुखी पडली असून अशा समदुःखी तरुणांच्या आयुष्याला पुन्हा पालवी फुटली आहे. दोन्ही मुळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून सद्य:स्थितीत अंबरनाथ येथे राहतात. या अनोख्या लग्नासाठी जळगाव-धुळे जिल्ह्यातील समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
चोपडा तालुक्यातील मुळ रहिवासी तथा निवृत्त पेालिस उपनिरीक्षक (कै.) हिरालाल उत्तम पाटील यांना विनोद व नितीन हे दोन मुलं. पाच वर्षांची चिमुरडी, पत्नी सुमित्राला सोडून ऐन तारुण्यात विनोद पाटील कोरोना महामारीत इहलोकी निघून गेला. कुटुंबात तरुण वहिनी आणि मुलीचा सांभाळ करताना दीर नितीन यांनी वहिनी सुमित्रा यांच्या पुनर्विवाह घडवून आणण्याचा विचार बोलून दाखवला.
मात्र, योग्य जोडीदार शेाधणार कोण, यावर उत्तर नव्हते. अशातच नितीन यांना कनाशी (ता.भडगाव) येथील रहिवासी ऋषीकेश रमेश पाटील (नंदू) यांची माहिती मिळाली. ऋषीकेश यांच्या शिक्षिका असलेल्या पत्नी अनघा यांचाही कोरोनात मृत्यू झाला असून वेळ न दवडू देता नितीन यांनी वहिनी सुमित्रा यांच्यासाठी प्रयत्न चालवले.
हेही वाचा: चौथा पती गळ्यात माळ टाकणार तोच...चतुर्भुज विवाहितेचा सिनेस्टाईल प्रताप
.. अखेर प्रयत्न यशस्वी
ऋषीकेश पाटील यांचे वडील रमेश नारायण पाटील यांनी होकार दर्शवत या स्थळासाठी यशस्वी बोलणी घडवून आणली. दोन्ही कुटुंबीयांनीही याला मंजुरी दिल्याने दोन्ही कुटुंबात आनंद संचारला. शुक्रवारी (ता.२७) ऋषीकेश यांचा विवाह सुमित्रा यांच्याशी अंबरनाथ येथील पार पडला. सोहळ्याला दोन्हींकडील नातलग, अंबरनाथचे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष सदाशिव पाटील (सदामामा), प्रसिद्ध उद्योजक रूपेश परशुराम दलाल, मनोज पाटील (रा. बोरखेडे ता.चाळीसगाव), सुधीर पाटील (रा.आसनखेडे ता.पाचोरा), सुभाष पाटील (रा.लोणपिराचे ता.भडगाव), संजय भदाणे (रा. बोरकुंड ता.जि.धुळे), शांताराम पाटील (रा. मामलदे ता. चोपडा) आदींसह जळगाव- धुळेसहित मुंबईतील अनेक प्रतिष्ठितांनी हजेरी लावली.
हेही वाचा: मुलगी बघायला आले अन् सरबताच्या ग्लासवर उरकले लग्न
Web Title: Brother Of Husband Take Initiative To Remarry The Sister In Law Who Had Lost Her Husband Due To Coronavirus In Jalgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..