
Jalgaon Crime News : शहरात घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना...
Jalgoan Crime News : मोठे घबाड हाती लागेल, या अपेक्षेने चोरट्यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरील मेडिकल दुकान फोडले. मात्र, त्यांना किरकोळ रकमेवरच समाधान मानावे लागले. शाहूनगर जेडीसीसी बँक कॉलनी व उस्मानिया पार्कमध्येही घरफोडी झाली. (burglary cases rising in jalgaon crime news)
जिल्हा रुग्णालयाच्या गेट क्रमांक तीनसमोर एस. एन. फार्मा औषधांचे दुकान आहे. सकाळी सहाच्या सुमारास दुकानाशेजारील जागेच्या मालकाने फरदीन शेख यांना भ्रमणध्वनीवरून दुकानाचे शटर वाकले असल्याची माहिती दिली. मालक दुकानाकडे आले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यात चोरटे दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये शिरताना व चोरी करताना, तसेच बाहेर जाताना दिसत आहेत. त्यावरून चोरटे सराईत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत फरदीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उस्मानिया पार्कमध्ये बंद घर फोडले
शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागात गेल्या चार दिवसांत तीन घरफोड्या झाल्या आहेत. मंगळवारी (ता. १६) पुन्हा एक घरफोडी झाली. अय्युब अली हयात अली (वय ६०) घर बंद करून सुरत येथे नातेवाइकांकडे गेले होते. चोरट्यांनी त्याच्या घराच्या मुख्य दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकत जवळपास लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शाहूनगरातही घरफोडी
शाहूनगरातील नुरानी मशिदीमागील जेडीसीसी बँक कॉलनीच्या गल्लीत चोरट्यांनी बंद घर फोडून दागिने व रोकड लंपास केली असून, याप्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.