
Jalgaon News : पोलिस पाटलास मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : पिंप्री बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील महिलेने दिलेल्या तक्रारीबाबत एका व्यक्तीस पेालिस ठाण्यात हजर राहण्याबाबत समज देण्यास गेलेल्या पोलिस पाटलाला गावातील एकाने शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना पोलिसांसमोर पिंप्री बुद्रुक येथे घडली.
या प्रकरणी पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून एकाविरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्री बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील एका महिलेने तात्याभाऊ बापूराव पवार याच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून तात्याभाऊ पवार यास मेहुणबारे पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते.
मात्र तो हजर न झाल्याने मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मिलिंद शिंदे, पोलिस कर्मचारी नीलेश लोहार हे पोलिस पाटील जयवंत शिंदे यांना घेऊन पवार यांच्या घरी जावून त्यास समज देत असतानाच गावातील योगेश शिंदे हा बोलला की मी इथे आलो आहे, तू घाबरू नको काहीही होत नाही.
माझे कुणीही काही करू शकत नाही, असे सांगत पोलिस पाटील जयवंत शिंदे यांना शिवीगाळ करीत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा आणला. या वेळी जमलेल्या नागरिकांसह पोलिसांनी पोलिस पाटील जयवंत शिंदे यांना मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सोडवत मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणले. ही घटना मंगळवारी (ता. २८) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.
या प्रकरणी पोलिस पाटील जयवंत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित योगेश शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके तपास करीत आहेत.