Jalgaon Ganesh Visarjan : एरंडोलला 17 गणेश मंडळांच्या अध्यक्षांविरोधात गुन्हे दाखल | Cases filed against president of 17 Ganesh Pandals in ganesh visarjan jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh visarjan procession DJ will be seized after crime filed

Jalgaon Ganesh Visarjan : एरंडोलला 17 गणेश मंडळांच्या अध्यक्षांविरोधात गुन्हे दाखल; वाद्ये सुरू ठेवल्याने कारवाई

Jalgaon Ganesh Visarjan : प्रशासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याबद्दल पोलिस प्रशासनातर्फे शहरातील प्रमुख सतरा सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर देखील पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईबाबत ॲड. महेश काबरे, ॲड. ज्ञानेश्वर महाजन व वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात मोफत बाजू मांडणार असल्याचे जाहीर केले आले. (Cases filed against president of 17 Ganesh Pandals in ganesh visarjan jalgaon news )

शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक दुपारी चारला सुरू करण्यात आली होती. प्रशासनाच्यावतीने सर्व गणेश मंडळांना रात्री बारानंतर मिरवणुकीत वाद्य वाजविण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच प्रशासनाने दिलेल्या वेळेच्या आत गणेशाचे विसर्जन करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मात्र विसर्जन मिरवणूक पहाटे साडेचारपर्यंत सुरू ठेवून तसेच रात्री बारानंतरदेखील वाद्य सुरू ठेवल्याबद्दल आणि पोलिस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल सतरा गणेश मंडळाच्या अध्यक्षांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हरीपुरी युवक गणेश मंडळाने विसर्जन मिरवणुकीत कोणतेही वाद्य लावलेले नसल्यामुळे या मंडळाच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शहरात अनेक वर्षांपासून अठरा सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत क्रमांकाने सहभागी होत असतात. मानाचा जयगुरू व्यायाम शाळेचागणपती मिरवणुकीत प्रथम क्रमांकावर असतो. त्यानंतर सर्व मंडळे क्रमाक्रमाने मिरवणुकीत सहभागी होत असतात.

यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य गणेश मूर्तींची स्थापना केल्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील काही ठिकाणी अरुंद रस्ते असल्यामुळे गणेशमूर्ती नेताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीस वेळ लागला. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली असून, देखील पोलिस प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी स्वत:चा एक फोटो, सातबारा उतारा आणि आधार कार्डाची झेरॉक्सबरोबर आणावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

..या मंडळांच्या अध्यक्षांवर कारवाई

याबाबत हवालदार मिलिंद कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीवरून जयगुरू व्यायामशाळा, संत सावता माळी व्यायामशाळा, बालवीर गणेश मंडळ, बालमित्र गणेश मंडळ, नम्रता गणेश मंडळ, सर्वोदय गणेश मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ, सर्वोदय गणेश मंडळ, ज्ञानदीप गणेश मंडळ, बालाजी मित्र मंडळ, भगवा चौकमित्र मंडळ, माहेश्वरी नावयुवक गणेश मंडळ, अखिल ब्राह्मवृंद युवक गणेश मंडळ, श्रीराम गणेश मंडळ, संताजी मित्र मंडळ या सतरा गणेश मंडळांच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :JalgaonAnant Chaturdashi