
ABHA Card : ‘आयुष्मान आपल्या दारी ३.०’ या उपक्रमात सर्व आशा आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन आयुष्मान कार्ड आणि ‘आभा’ कार्ड काढून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. रविवार (ता. १७)पासून घरोघरी जाऊन मोहीम राबविण्यात येणार आहे.
२१ लाख ८४ हजार ८३९ आयुष्मान कार्डांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत चार लाख ९१ हजार ६७४ कार्ड काढण्यात आले आहेत. (CEO Ankit statement about Aim of Ayushman Card will be achieved jalgaon news)
तर, ‘आभा’ कार्डसाठी ४२ लाख २९ हजारांचे उद्दिष्ट असून, १२ लाख २० हजार कार्ड काढण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ अंकित यांनी शनिवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिली.
श्री. अंकित म्हणाले, की आयुष्मान भव ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. १३ सप्टेंबरपासून सुरू असलेली ही मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ १३ सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यात पूर्ण आरोग्य संस्थेत करण्यात आला. यात, ‘आयुष्मान आपल्या दारी ३.०’, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा, अंगणवाडी व शाळेतील मुलांची तपासणी या योजनांचा समावेश आहे.
आयुष्मान मेळावा उपक्रमात रक्तदान, शस्त्रक्रिया आदी शिबिरे होतील. यात पुढीलप्रमाणे तपासणी शिबिरही होईल. पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य रोगनिदान, दुसऱ्या आठवड्यात संसर्गजन्य रोगनिदान, तिसऱ्या आठवड्यात गरोदर माता व बालकांची तपासणी आणि चौथ्या आठवड्यात नाक, कान, घसा व नेत्ररोग रुग्णांची तपासणी करण्यात येईल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आयुष्मान सभा अंतर्गत २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त गाव पातळीवर आयुष्मान सभा होतील. सर्व आजारांची माहिती देणे, तसेच आयुष्मान कार्डबाबत जनजागृती करणे हा उद्देश असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, डॉ. मारोती पोटे, आकाश चौधरी, पंकज शिंपी आदी उपस्थित होते.
अंगणवाडी, शाळेतील मुलांची तपासणी
या मोहिमेत ० ते १८ वयोगटातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, आजारी आढळून आलेल्या बालकांना उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यात नऊ लाख ८८ हजार १६३ बालकांची तपासणी केली जाईल, असेही ‘सीईओ’ अंकित यांनी सांगितले.