Road Construction : शहरातील रस्ते कोटिंगअभावी उखडले; नागरिकांना त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road construction

Road Construction : शहरातील रस्ते कोटिंगअभावी उखडले; नागरिकांना त्रास

जळगाव : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक (Citizen) त्रस्त झाले होते.

आता बांधलेल्या रस्त्यांवर कोटिंग नसल्यामुळे रस्त्यावर आलेल्या खडींमधून वाहने काढावी लागत आहेत. (City roads collapsed due to lack of coating due to negligence of municipal construction department jalgaon news)

रस्ते बांधले, तरी जळगावकरांचा त्रास अद्यापही कमी झालेला नाही. यातून नेमकी कधी सुटका होणार, असा प्रश्‍न जळगावकरांना पडला आहे.

जळगाव शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. कामासाठी निधीच्या मोठमोठ्या घोषणा होत आहेत. मात्र, रस्त्यांची कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शासनाने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला. त्या निधीतून काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे, तर काही रस्ते महापालिकेच्या निधीतून करण्यात आले. मात्र, रस्त्यांची कामेही पूर्ण झालेली नाहीत.

रस्त्यावर कोटिंगच नाही

महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मक्तेदारांनी रस्त्यांची कामे केली आहेत. मात्र, काही रस्त्यांवर केवळ खडी टाकून रस्ते तसेच सोडून दिले आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारे कोटिंग केलेली नाही. रेल्वेस्थानकाकडून बळिराम पेठकडे उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या रस्त्याचे काम झाले आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

मात्र, त्यावर कोटिंग करण्यात न आल्याने त्या रस्त्यावरची खडी पूर्णपणे उखडली आहे, तर उड्डाणपुलावरील श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यान व केळकर मार्केट या दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रस्तेही कोटिंगअभावी उखडले आहेत. याशिवाय बळिराम पेठ व इतर भागांत रस्त्यांवर कोटिंग करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता रस्तेही उखडत असून, त्याची खडीही वर येत आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता खडी चुकवत रस्ता काढावा लागत आहे.

महापालिका, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग मक्तेदारांना शहरातील रस्त्यांची कामे देत आहेत. मात्र, त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत पाहणी करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मक्तेदार दर्जाहीन रस्त्यांची कामे करीत आहेत. त्याचा त्रास मात्र जनतेला होत आहे. हे दोन्ही विभाग रस्त्यांच्या कामाकडे लक्ष देतील काय? संबंधित मक्तेदारांना सूचना देऊन त्यांच्याकडून कोटिंगची कामे करून घेतली जातील काय, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

महासभेत निकृष्ट कामासाठी ‘समिती’

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या. रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ही समिती कधी पाहणी करणार, याकडेही आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :JalgaonRoad Construction