
Jalgaon Crime News : दोन गटात तुंबळ हाणामारी; बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (जि. जळगाव) : घरी जा, असे सांगितल्याचा राग आल्याने, तसेच माजी नगरसेवकाला किंमत देत नाही म्हणून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी माजी नगरसेवकासह बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Clash between two groups case registered against twelve people Jalgaon Crime News)
सबनूरबी सलीम शेख यांनी फिर्याद दिली, की शुक्रवारी (ता. ३) रात्री अकराला गांधलीपुरा भागात घरी असताना त्यांचे पती सलिम शेख यांनी गल्लीतील मुलांना सांगितले, की आता रात्र झाली आपापल्या घरी जा, त्याचा राग येऊन गल्लीतील कैसर अली आबिद अली हातात लोखंडी पाइप घेऊन आले व जावई कादिर अली नूर अली यांच्या डोक्यात मारला,
त्यानंतर जावेदअली आबीद अली, अख्तर अली अहमर अली, अर्षद अली अहमर अली, शोहेब अली आबीद अली, आबीद अली अहमर अली, शाहिद अली हाशम अली यांनी हातातील लाकडी दांड्यांनी पुतण्या बबलू शेख गयासोद्दीन याला डोक्याला मारहाण करून जखमी केले.
तसेच अहमर अली व शोहेब अली यांनी मुलगा इम्रान शेख याला डोक्यावर दांडका मारून जखमी केले. अमळनेर पोलिस ठाण्यात सातही जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी बापू साळुंखे तपास करीत आहेत.
दुसऱ्या गटातर्फे अख्तर अली अहमद अली (वय ४४) यांनी जखमी अवस्थेत पोलिसांना जबाब दिला की आम्ही संशयित सलिम शेख याला किंमत देत नाही व त्यांच्यासोबत उठत बसत नाही म्हणून सलिम चिरागोद्दीन शेख उर्फ सलिम टोपी हा व त्याच्या सोबतचे दोन लोक हातात दांडके घेऊन गांधलीपुरा भागात वहिनी व आजीला शिवीगाळ करत असल्याचा मला मुलीचा फोन आला.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
म्हणून मी पळत तेथे गेलो असता दरवाजातच जावई कदिरअली नूरअली व पुतण्या शकिलोद्दीन गयासोद्दीन यांनी लाकडी दांडक्याने नाकावर व खांद्यावर मारहाण केली तसेच त्याचवेळी इम्रान शेख राजू गयासोद्दीन यांनी हातातील स्टिकने पायावर मारहाण केली.
त्यामुळे रक्तस्राव होऊन मी जखमी झालो आणि आजूबाजूच्या लोकांनी मला नर्मदा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जबाबवरून पाचही आरोपीविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी रामकृष्ण कुमावत तपास करीत आहेत. पोलिसांना घटना कळताच पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलिस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे व त्यांच्या पथकातील १५ कर्मचाऱ्यांनी जाऊन शांतता परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर त्या भागात गस्त घालण्यात आली.