
Gram Sadak Yojana : जळगाव ग्रामीण मतदारसंघात 70 कोटींची कामे मंजूर
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा (cm gram sadak yojana) पहिला टप्पा यशस्वी झाला आहे.
दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता मिळाली आहे. (cm gram sadak yojana 70 crore works approved in rural constituency jalgaon news)
मंत्री पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात ७५ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ६६ कोटी ८६ लाख व देखभाल दुरुस्तीसाठी तीन कोटी, असा एकूण सुमारे ७० कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण मतदारसंघातील रस्त्यांचा काय पालट होणार आहे.
ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर या योजनेची आखणी केली आहे. या योजनेतून राज्यातील वाड्या, वस्त्या, गावांना रस्ते बांधून देण्याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या व दुरवस्था झालेल्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचे धोरण निश्चित केले आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र समित्या स्थापन केल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या समितीमार्फत रस्तेबांधणी आणि दर्जोन्नतीसाठी गावांची निवड केली जाते, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादन करणे, अतिक्रमणे हटविणे व इतर अडचणी दूर करून समन्वय साधला जातो.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात धरणगाव विवरे ते भवरखेडा रस्ता धरणगाव-विवरे- भवरखेडा ते तालुका हद्द, झुरखेडा-खपाट ते पिंपळेसीम, चावलखेडा ते पष्टाणे ग्रामीण मार्ग १९, विवरे-जांभोरा-सारवे खुर्द ते बिलखेडा, अशा चार रस्त्यांच्या ३३ किलोमीटर रस्त्यांसाठी २५ कोटी ८८ लाख २१ हजारांचा निधी मंजूर झाला आहे.
जळगाव तालुक्यातील डोमगाव- पाथरी ते तालुका हद्द, भोकर-पडसोद-जामोद- आमोदे ते गाढोदा, आसोदा ते भोलाणे ग्रामीण मार्ग १०५, खेडी ते ममुराबाद इजिमा ८८ रस्ता, कानळदा ते रिधूर ग्रा.म. ३९ रस्ता, प्रजिमा ३९ ते शिरसोली रस्ता तालुका हद्द दहीगाव रस्ता, अशा सहा रस्त्यांच्या ४२ किलोमीटरसाठी ४० कोटी ९८ लक्ष ४९ हजार निधी मंजूर झाला आहे.
"मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता मिळाली आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते खऱ्या अर्थाने दर्जेदार होत आहेत. मक्तेदारावर पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित केली आहे. या योजनेत रस्त्यांचे काम दर्जेदार होणार असून, गावांतर्गत काँक्रिट रस्ते, आवश्यक तेथे पूल, संरक्षक भिंती कामांचा समावेश असल्याने परिपूर्ण रस्त्याचा विकास होणार आहे." -गुलाबराव पाटील, पालकमंत्री