
Jalgaon News : तहसीलदार आंदोलनासाठी नाशिकला! विविध दाखल्यांसाठी नागरिकांचे हाल
जळगाव : नाशिक विभागातील नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) नाशिक विभागातील सर्व तहसीलदार(Tehsildar) , नायब तहसीलदारांनी सामूहिक रजा आंदोलन केले. (Collective leave protest by all Tehsildar Naib Tehsildar of Nashik division jalgaon news)
यामुळे नागरिकांची सोमवारी कामे झालीच नाही. सही करणारे साहेबच नसल्याने काम कसे होणार? साहेब नसल्याने इतर कर्मचारही सोयीप्रमाणे ये-जा करताना दिसले. मात्र नागरिकांची कामे खोळंबली. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदारांनी सोमवारी नाशिक येथे जाऊन विभागीय आयुक्त अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार पद अत्यंत महत्त्वाचे पद आहे. हे पद राजपत्रित वर्ग २ असूनही त्यास मिळणारा ग्रेड पे हा वर्ग ३ चा असल्याने १९९८ पासून आजपावेतो शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार शासनाने केलेला नाही. यासंदर्भात कोणतीही माहिती शासन स्तरावरून संघटनेस अद्यापही देण्यात आलेली नाही.
संघटनेने नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० करण्याच्या अनुषंगाने शासनाला यापूर्वीही बेमुदत संपाची नोटीस दिली होती. मात्र, राज्य सरकारने याबाबत कुठलीही दखल घेतलेली नाही. तत्कालीन महसूल मंत्री, वित्त मंत्री, अपर मुख्य सचिव यांच्यासह झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
तथापि, त्याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. श्री. के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतनत्रुटी समितीसमक्ष नायब तहसीलदारांचा ग्रेड पे ४३०० वरून ४८०० करण्याबाबत सादरीकरण करूनही श्री. बक्षी यांना नायब तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप, जबाबदारी आदी सर्व माहिती असूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार केलेला नाही.
वरील मागण्यांची दखल न घेतल्यामुळे मागणी मान्य होईपर्यंत एकमताने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची भूमिका स्वीकारण्याचा एकमताने निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यानुसार सोमवारी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले.
नाशिकचे महसूल आयुक्त बाळकृष्ण गमे यांना निवेदन देतेवेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष पंकज पवार, राज्य कार्यालयीन सचिव नरेश बहिरम, राज्य सहसचिव शशिकांत मंगरूळे, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, नायब तहसीलदार रमेश देवकर (भडगाव), राजेंद्र महिरे (भडगाव), एस. पी. शिरसाठ (पारोळा), दिलीप पाटील (एरंडोल), रवींद्र पाटील (यावल) आदी उपस्थित होते.