Collector orders to District Deputy Registrar to Pay depositors through RTGS jalgaon news | Jalgaon News : ठेवीदारांना ‘RTGS’द्वारे रकमा द्या! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon District Collector Aman Mittal

Jalgaon News : ठेवीदारांना ‘RTGS’द्वारे रकमा द्या! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Jalgaon News : जिल्ह्यातील सुमारे ४४ पतसंस्थांच्या ठेवीदारांना ठेवीच्या रक्कमा अद्यापपर्यंत न मिळाल्याने ठेवीदारांनी पुन्हा मंगळवारी (ता. १६) जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची भेट घेऊन ठेवी परत देण्याची मागणी केली. (Collector orders to District Deputy Registrar to Pay depositors through RTGS jalgaon news)

ज्या-ज्या पतसंस्थेत कर्जदारांकडून कर्ज वसुली झाली असेल, त्या पतसंस्थेच्या ठेवीदारांना समप्रमाणात ‘आरटीजीएस’द्वारे ठेवीची रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मित्तल यांनी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांना दिले आहेत.

गेल्या २५ एप्रिलला ठेवी न मिळाल्याने झालेल्या हालाची आपबिती ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली होती. काही महिला ठेवीदारांना रडू कोसळले, तर काहींनी कुटुंबीयावर वेळीच औषधोपचार करता न आल्याने त्यांना गमाविल्याची खंत व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांना बोलावून त्यांना ठेवीच्या रक्कमा देण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांची एक समिती असेल. जी ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.

सोबतच सर्व पतसंस्थाचालकांची बैठक घेण्यात येईल, असे ठरविण्यात आले होते. सोबतच १५ मेपर्यंत ठेवी परत देण्याविषयी सांगितले होते. यामुळे खानदेश ठेवीदार कृती समिती व जळगाव जिल्हा महिला ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, महिलाध्यक्षा संध्या चित्ते यांनी मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवी मिळत नसल्याचा पाठपुरावा केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी श्री. बिडवई यांच्याकडून ठेवी वसुलीचा आढावा घेत, संबंधित ठेवीदारांना ‘आरटीजीएस’द्वारे ठेवीच्या रक्कमा देण्याचे आदेश दिले. ठेवीदार संघटनेने चेकद्वारे रकमा देण्याची मागणी केली होती.

टॅग्स :JalgaonCollectorZP