
Rahul Gandhi News : राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेसचा ‘सत्याग्रह’
Jalgaon News : केंद्रातील भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द केले. वास्ताविक श्री. गांधी यांना एक महिन्याची मुदत सर्वाच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सुरत न्यायालयाने दिली आहे.
मात्र, त्यालाही फाटा देत भाजपच्या कुटनीतीने, लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधीचे सदस्यत्व रद्द केले. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवनासमोर सत्याग्रह आंदोलन केले.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले, की गौतम अदानी यांनी २० हजार कोटींची मालमत्ता कशी जमा केली? सेल कंपनी कशी तयार झाल्या? त्यांना कोणत्या मुखयमंत्र्यांनी कशी मदत केली याचा खुलासा राहुल गांधी मागणार होते.
यामुळे गांधी विरोधात कोणत्या तरी राज्यातील व्यक्तीची जुनी केस काढून, त्यात गांधी यांना अडकविणयात आले. मला केस करायची नाही, असे संबंधिताने वर्षभरापूर्वी सांगितले होते. त्याला केसमध्ये पुढे करून, त्या केसचा निकाल दोन वर्ष शिक्षा होईल, असा लावण्यात आला.
सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार गांधी एक महिन्यापर्यंत वरच्या न्यायालयात दाद मागू शकतात. मात्र, त्यांना तशी दाद न देता भाजपने गांधीचे सदस्यत्व संपविले. त्याचा निषेधार्थ सत्याग्रहाला बसलो आहेत.
आमदार शिरीष चौधरी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, शहराध्यक्ष श्यामकांत तायडे, फ्रंटल काँग्रेसचे देवेंद्र मराठे, सचिन सोमवंशी, महिला काँग्रेस आघाडीसह सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.