ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव टांगणीला

जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेकेदाराला एक दमडीही दिली नाही. पुरवठादारांवरही एजन्सीचे देणे वाढल्याने तसेच तीव्र टंचाई असल्याने डिस्ट्रिब्यूटरने बुधवारी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला.
ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव टांगणीला

भुसावळ : शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा कोविड ‘डीसीसीएच’मध्ये १४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मात्र, बुधवारी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. पुरवठादारालाच एजन्सीकडून ऑक्सिजन मिळत नसल्याने स्थिती बिकट झाली. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाचे डॉ. नि. तू. पाटील यांनी स्वखर्चातून दहा सिलिंडरचा पुरवठा करून दिला.

भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णालयात एक वर्षापासून ऑक्सिजन पुरवठादाराचे सव्वादोन लाख रुपये थकीत आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेकेदाराला एक दमडीही दिली नाही. पुरवठादारांवरही एजन्सीचे देणे वाढल्याने तसेच तीव्र टंचाई असल्याने डिस्ट्रिब्यूटरने बुधवारी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला. यामुळे ग्रामीण रुग्णालयातही सिलिंडर उपलब्ध झाले नाही. बुधवारी सकाळी केवळ पाच सिलिंडर उपलब्ध होते. यामुळे केवळ सायंकाळपर्यंत रुग्णांना ऑक्सिजन देता येणार होता. यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी चिंतेत होते. भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नि. तू. पाटील यांना हा विषय समजल्यानंतर त्यांनी हिंदुस्तान एजन्सीतून सात हजारांचे तूर्त दहा सिलिंडर खरेदी करून ग्रामीण रुग्णालयात पाठवले. हा ऑक्सिजनचा साठा गुरुवारी सकाळी नऊ ते दहापर्यंत टिकू शकेल. यानंतर मात्र पुन्हा सिलिंडरची गरज भासणार आहे. जिल्हा प्रशासकीय यंत्रणा, जिल्हा आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधी ही सर्व बिकट परिस्थिती पाहूनही ठोस निर्णय घेत नसल्याने १४ रुग्णांचा जीव टांगणीला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा होत नसेल, तर उपचार होतील कसे? असा प्रश्नही निर्माण होत आहे.

५० वाढीव बेडचे नियोजन फोल
ट्रामा सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त सुविधेचे ५० बेडचे नियोजन आहे. यासाठी १५ क्युबिक मीटरचा ऑक्सिजन जनरेशन प्लॉटला आमदार संजय सावकारे यांनी ३० लाखांचा निधी दिला आहे. मात्र, सप्टेंबरपासूनचे हे नियोजन सात महिने उलटूनही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे मात्र ऑक्सिजनअभावी रुग्ण कासावीस आहेत.

ट्रामा केअर सेंटरमध्ये १६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसाला २० सिलिंडरची आवश्यकता असते. मात्र, ऑक्सिजनचा पुरवठा वरूनच होत नाही. ही काही केवळ ट्रामा सेंटरची समस्या नसून सार्वत्रिक समस्या आहे. बाहेर खासगी सेंटरमध्येही ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना हलवावे लागत आहे.
‌- डॉ. विक्रांत सोनार, ट्रामा केअर सेंटर, भुसावळ

ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचा पुन्हा पुरवठा लागणार आहे. यामुळे समाजातील दानशूरांनी मदत करून किमान ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून द्यावे. सुस्तावलेल्या जिल्हा व आरोग्य प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल.
- डॉ. नि. तू. पाटील
सहसंयोजक, भाजप वैद्यकीय आघाडी

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com