हाॅस्पीटलच्या अवाजवी बिलांवर आता देखरेख समिती अंकुश 

हाॅस्पीटलच्या अवाजवी बिलांवर आता देखरेख समिती अंकुश 

जळगाव  : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने रुग्णालये फुल झाली आहेत. मात्र, काही खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिल आकारणी केली जात असून, या रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, एक समिती गठित करण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोना संदर्भातील विविध विषयांबाबत  महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. 

रुग्णांची सर्रास लूट : 
खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करताना शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार बिलाची आकारणी न करता लाखोंची बिले काढली जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. रुग्णालयांच्या मनमानीमुळे गरजूंना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेता रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी महापौरांनी केली. 

लवकरच समिती : 
जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या संदर्भात लवकरच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांची एकत्रित समिती गठित करण्यात येऊन रुग्णालयांची तपासणी करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच जर कुणाकडून अधिकचे बिल आकारणी केले असल्यास त्याची बिले आमच्याकडे सादर केल्यास आकारणी केलेली अतिरिक्त रक्कमदेखील परत मिळवून देऊ, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. 

शहरात निर्जंतुकीकरण : 
शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे महापौरांनी आरोग्य विभागाला शहरातील विविध भागात, व्यापारी संकुले व अन्य सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात जंतुनाशकाची फवारणी सुरू करण्यात आली आहे. 
 

संपादन-  भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com