esakal | ज्येष्ठांचे लसीकरण लसीकरणाची उत्सुकता; पण केंद्राकडून मार्गदर्शन नाही  ​

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठांचे लसीकरण लसीकरणाची उत्सुकता; पण केंद्राकडून मार्गदर्शन नाही   ​

केंद्र शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठांना १ मार्चपासून लसीकरण करण्याची घोषणा केली. जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास किमान चार ते पाच लाखांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत.

ज्येष्ठांचे लसीकरण लसीकरणाची उत्सुकता; पण केंद्राकडून मार्गदर्शन नाही  ​
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः केंद्र शासनाने देशातील सर्व ज्येष्ठांना १ मार्चपासून लसीकरणाची घोषणा केली आहे. असे असले तरी जिल्हा आरोग्य यंत्रणेला अद्यापही केंद्राकडून ज्येष्ठांचे लसीकरण कसे करावे, त्यांची नोंदणी कशी करावी, लसीकरणासाठी किती केंद्रे असावीत, त्यात काय दक्षता घ्यावी, लसींचा पुरवठा कोठून होणार, याबाबत कसलेही मार्गदर्शन आलेले नसल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा ज्येष्ठांचे लसीकरण कसे करावे याबाबत संभ्रमात आहे. १ मार्चपासून लसीकरण करायचे आहे अन् दोन दिवस सुटीचे असल्याने तयारी कोणत्या बाबींची करावी, याबाबत वरिष्ठांना विचारणा केली जात आहे. 

आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६० हजार पार
 

जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोविड लसीकरणाची आतापर्यंत १९ केंद्रे सुरू केली आहेत. त्यात आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्र, महसूल, पोलिसांना लसीकरण केले जात आहे. लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. ज्यांनी जानेवारीस लस घेतली होती त्यांना दुसरा डोस दिला जात आहे. 

ज्येष्ठांन ‘कोविन’ ॲपची मदत होणार 
आता केंद्र शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठांना १ मार्चपासून लसीकरण करण्याची घोषणा केली. जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास किमान चार ते पाच लाखांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. आरोग्य, महसूल, पोलिस क्षेत्रातील व्यक्तीची माहिती मागवून ती ‘कोविन’ ॲपद्वारे फीड केली. नंतर लस देण्यात आली. आता ज्येष्ठांना लसीकरणासाठी स्वतः कोविन अॅपवर आपली नावनोंदणी करावी लागणार आहे. त्यावर माहिती पूर्ण भरल्यानंतरच नोंदणी होईल. नोंदणीशिवाय व ज्येष्ठांसाठीचे पोर्टल अनलॉक केल्याशिवाय लसीकरण होणार नाही. सोबतच केंद्राने लसींचा पुरवठा केलेला नाही. मार्गदर्शनही केलेले नाही. १ मार्चला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने ज्येष्ठांना नावनोंदणीस पुरसा अवधी मिळणार नाही. उशिरा नोंदणी होऊन लसीकरणही उशिरा सुरू होणार आहे. मात्र १ मार्चपासून आपल्याला लस मिळणार, अशी आशा ज्येष्ठांना आहे. 

ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत केंद्राकडून मार्गदर्शन आलेले नाही. मार्गदर्शन आल्यानंतर त्यातील सूचनांनुसार लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली जाईल. केंद्राच्या लसीकरणाची आम्ही वाट पाहात आहोत. 
-डॉ. एन. एस. चव्हाण, 
जिल्हा शल्यचिकित्सक 

संपादन- भूषण श्रीखंडे